Type Here to Get Search Results !

चंद्रभागेचं प्रदुषण कायमस्वरूपी थांबवण्यासह अनेक मागण्या; अ. भा. वा. मंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


पंढरपूर : पंढरपुरातील ड्रेनेज व गटारीचं घाण पाणी मिसळल्याने चंद्रभागा नदीच्या पाण्याचं होणारं प्रदुषण कायमस्वरूपी थांबवण्यात यावं, यासह अनेक मागण्यांचे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  ह.भ.प. सुधाकर इंगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आले.

आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यांनी पंढरपुरातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर प्रशासनाने स्वच्छतेवर अधिकाधिक भर द्यावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६५ एकर येथे पाहणी दौरा करीत असताना ह.भ.प. अक्षय भोसले यांच्या प्रयत्नाने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट झाली, या भेटीत  अखिल भाविक वारकरी मंडळाच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाच्या स्वरुपात मांडण्यात आल्या.



चंद्रभागेचं पाणी स्वच्छ रहावं, वारीला येणाऱ्या भाविकांचा मृत्यू नैसर्गिक जरी झाला तरी त्यांना मदत मिळावी, एकादशीला व्ही. आय. पी. दर्शन पूर्ण बंद करण्यात यावं, ६५ एकर मध्ये कुठलेच शिबिर घेण्यात येऊ नये. ती जागा फक्त वारकरी दिंडीला राखीव असावी, आषाढीवारीप्रमाणे इतर तिन्ही वारीला सरकारने मदत करावी, सर्व वारीला नदीमध्ये वाहते पाणी असावे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल कायमस्वरुपी तयार करावं या मागण्यांचा समावेश आहे. यातील प्रमुख मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दर्शविलीय.

यावेळी माजी नगरसेवक अमोल शिंदे, शिवाजी सावंत उपस्थित होते.