Type Here to Get Search Results !

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकर दाखवणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोकणी हिसका


अंकिता प्रभू-वालावलकरने 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल कोणाला केला? 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणाली...

महाराष्ट्रातील तमाम रसिकांचा लाडका असलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये शोमध्ये बरेच मोठे बदल झाल्याचे आपल्याला दिसून आले आहेत. मग ते नव्या होस्टचं येणं असो..  किंवा मग नवा खेळाडू.. सगळं कसं जबरदस्त पॉवरने भरलेलं आहे. 

यंदा 'बिग बॉस मराठी'चे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख करत आहे. नुकताच या शोचा ग्रँड प्रिमियर दणक्यात पार पडला. दरवेळी प्रमाणे यंदाही 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली असून या  स्पर्धकांमध्ये मालवणची 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू-वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात धमाका करायला सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अंकिताने तिच्या अनोख्या अंदाजाने आणि ओळखीनं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

अंकिताने 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईला एकंदरीतच तिची काळजी वाटली. याबद्दल अंकिता म्हणाली,"तू घरात कशी काम करशील? भांडी घासशील?" असे आईचे प्रश्न सुरू झाले. बाबांना कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचित्र होती. ते थेट म्हणाले,"तू घरी परत कधी येणार?".

अंकिता पुढे म्हणाली,"मी पहिल्यांदाच फोनशिवाय कुठेतरी राहणार आहे. याबद्दल मला थोडं अवघड वाटतंय, पण माझा निर्धार मात्र पक्का आहे. जर 'बिग बॉस'ने मला संधी दिली घरात काहीतरी घेऊन जायचं, तर मी माझा फोन घेऊन जाईन. फोनशिवाय राहाणं मला कठीण वाटत असलं तरी मी माझ्या कोकणी अंदाजात सगळ्यांना प्रभावित करण्यासाठी आता घरात सज्ज आहे. 

माझ्या मित्रांनी देखील मला सल्ले दिले आहेत की, घरात जाऊन जा भांडण कर जोरदार, भांडण केलेस तरच टिकशील. पण माझे असं आहे की, मी यावेळी  नव्या सीझनमध्ये काही तरी वेगळे दाखवणार आहे. न भांडता छान वागून पॉझिटिव्ह  राहीन. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोन होणाऱ्या नवऱ्याला केला. त्याला सांगितले की, सगळ्यांची काळजी घे. आता गणपती येणार आहेत तर घरात सगळे सेट कर लक्ष असू दे."

अंकिताचा प्रवास अनोखा आणि रोमांचक ठरणार आहे. कोकणाच्या साधेपणाने आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेली अंकिता नक्कीच 'बिग बॉस'च्या घरात एक नवीन रंग भरणार आहे. तिची कोकणी भाषा, तिच्या गावची खासियत, आणि तिचं अनोखं वागणं यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळणार हे नक्कीच! 

प्रेक्षकांसाठी एक मोठी उत्सुकता आहे की, अंकिता प्रभू-वालावलकर 'बिग बॉस'च्या घरात कोणता कोकणी हिसका दाखवणार आहे आणि तिच्या या प्रवासात काय-काय घडणार आहे. तिच्या फॅन्सनी तिला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज व्हायला हवं, कारण 'कोकण हार्टेड गर्ल' आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात दाखल झाली आहे!

पाहा 'बिग बॉस'मराठीचा नवा सीझन करा एन्जॉय दररोज रात्री 9 वाजता पाहा. फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर...