सोलापूर : पोलिसांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याची गच्ची पकडून हुज्जत घालत धक्काबुक्की, शासकीय कामात अडथळा व सोडविण्यास आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याच्या आरोप असलेल्या तिघा आरोपींना येथील विशेष सत्र न्यायाधीश एस.व्ही. केंद्रे यांनी जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २० जून रोजी रात्री ०८ वा. च्या सुमारास सात रस्ता चौकालगत असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयासमोर गोंधळ सुरू होता. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेले सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे यांची गच्ची पकडून तिघांनी त्यांना धक्काबुक्की केली.
त्यावेळी प्रसंगावधान लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक लकडे यांच्या मदतीसाठी व सोडवा-सोडवी करण्याच्या उद्देशाने आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात सादिक उलफत हुसेन शेख, सोहेल सादिक शेख, मोहसीन सादिक शेख (सर्व रा- सहारा नगर, होटगी रोड, सोलापूर) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीनासाठी एडवोकेट रियाज एन. शेख यांनी न्यायालयासमोर अर्ज ठेवला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी होऊन, विशेष सत्र न्यायाधीश एस.व्ही. केंद्रे यांनी तिन्ही आरोपींचा जामीन मंजूर केला. यावेळी आरोपीतर्फे अॅड. रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. शैलेजा क्यातम यांनी काम पाहिले.