Type Here to Get Search Results !

जबरी चोरी ... ! शेळ्या चारण्यास गेलेल्या महिलेस मारहाण करून अंगावरील ५० हजार रुपयांचे दागिने नेले हिसकावून

 

मोहोळ : वनविभागाच्या क्षेत्रात शेळ्या चारण्यास गेलेल्या महिलेस मारहाण करून तिच्या अंगावरील ५० हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मोहोळ तालुक्यातील हिवरे शिवारात रविवारी, ३० जून रोजी घडलीय. रंभा श्रीमंत कसबे (वय-६१ वर्षे) असं दागिन्यांची लूट झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी गुरूवारी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हिवरे येथील रंभा श्रीमंत कसबे ही महिला वन विभागाच्या क्षेत्रात तिच्या शेळ्या घेऊन चारण्यास गेली होती. ती जेथे शेळ्या चारत होती तेथून थोड्याच अंतरावर तळे असून त्या ठिकाणी तिची भावजय मंगल बळीराम नाकईनवरे ही सुध्दा तिच्या शेळ्या चारत होती. त्यांची हितगुज झाल्यावर त्या आप-आपल्या शेळ्या चारत होत्या.

रंभा कसबे ही दुपारी ०२ वा. च्या सुमारास शेळ्या चारत असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने तिच्या तोंडावर विटकरी रंगाचाचा गमजा टाकून तिला धक्काबुक्की सुरू केली. त्यावेळी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात ती खाली पडल्याने तिच्या डोकीस दुखापत झाली. त्यावेळी त्या अनोळखी इसमाने तुझ्या कानातील कर्णफुले आणि गळ्यातील सोन्याचे गंठण काढून दे नाहीतर तुझ्या जीवाचे बरे वाईट करतो, अशी धमकी दिली. 

तिने धमकीला घाबरून गळ्यातील गंठन व कानातील फुले काढून दिल्यावर घटनास्थळावरून तो अज्ञात इसम पळून जात असताना बघितले असता, तो अंगाने सडपातळ, अंगात नेसणेस पाढंरा शर्ट, ठिपके असलेला काळी पँन्ट अशी होती. तिने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण पळून  गेला. तिने घरी जाऊन घडला प्रकार तिच्या मुला-मुलीला सांगितला.

त्यानंतर रंभा कसबे व तिचा मुलगा तक्रार देण्यासाठी मोहोळ पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी अगोदर जखमीस उपचारारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविले. त्यानंतर ०४ जुलै रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत अज्ञातानं सुमारे ५० हजार रुपये अधिक किमतीचे दागिने जबरदस्तीने हिसकाऊन नेले. पोलीस उपनिरीक्षक करणेवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.