सोलापूर : गरोदरपणात महिलांनी नियमित तपासणी, लसीकरण, पुरेशी झोप, पोषक व सकस आहार, झेपेल एवढा व्यायाम केल्यास प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत होत नाही. गरोदर महिलांनी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, डिंक लाडू, शेंगा लाडू, अंडी, दूध यांचा समावेश केल्यास माता सशक्त होते व सशक्त गर्भवती माताच सशक्त बाळाला जन्म देऊ शकते, असं प्रतिपादन डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी केले.
रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी क्र. ०१ यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर व स्तनादामातांना प्रोटीन पावडर डब्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटचे अध्यक्ष सचिन तोष्णीवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. येळेगांवकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंगचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली, रोटरी क्लबचे सचिव आदर्श गोयदानी, खजिनदार अल्पेश साबू, आय. एम. ए. चे माजी अध्यक्ष डॉ. केदार कहाते, अंगणवाडी सुपरवायझर शैलजा धुमाळ, अक्षय जवेरी, यशवंत बच्चुवार, बसवराज उंबरजे, माजी अध्यक्ष वेंकटेश सोमानी, प्रकाश पोटाबत्ती, अमीत इनांदे, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. येळेगांवकर पुढं म्हणाले, प्रसूती नॉर्मल होण्यास देखील यामुळे मदत होते. प्रसूतीनंतर स्तनदा मातांनी आपल्या बाळाला नियमीत स्तनपान करणे आवश्यक आहे. बाळाला अंगावर पाजल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. आई आणि बाळात आपुलकीचं घट्ट नातं निर्माण होतं. स्तनपान हे आई व बाळास उपयुक्त असते असं सांगून त्यामुळे बाळाचा बुद्धांक वाढतो, बाळ सुदृढ होते, बाळाच्या वाढीच्या टप्प्यावर नियमित लसीकरण केल्यास बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून बाळ निरोगी राहते, असंही फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी शेवटी म्हटले.
यावेळी भवानी पेठ परिसरातील ६० गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीन पावडर डब्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या चालू वर्षात रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व विविध संस्था मिळून २,००० गरोदर व स्तनदा मातांना सकस आहार व प्रोटीन पावडर डब्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे चेअरपर्सन डॉ. एन. बी. तेली यांनी जाहीर केले..
कार्यक्रमाचे स्वागत आदर्श गोयदानी यांनी केले. प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन आकाश गायकवाड यांनी केले तर आभार अल्पेश साबू यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा चव्हाण, कांचन हुन्नूरे, स्वप्निल सोनवणे, ऋषिकेश तमायचे, अंगणवाडी सेविका सुवर्णा स्वामी, प्रतिभा हेने, सरोज बाबरे, जयश्री सदाफुले, शशिकला गुंजे, निशा भोसले, पार्वती कोळी, मीना कांबळे आदींनी परिश्रम घेतले.