Type Here to Get Search Results !

... तर कितीही बंदोबस्त लावा, मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा होऊ देणार नाही !


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना गणेश अंकुशराव यांचं निवेदन 

पंढरपूर : आदिवासी कोळी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर तुम्ही पंढरपुरात कितीही बंदोबस्त लावा, पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत दिला आहे. महादेव कोळी समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना अडवणार असा इशारा पालकमंत्र्यांसमोर देण्यात आला.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या चंद्रभागेतील प्रलंबित स्मारकाचे काय झाले? मंजूर होऊनही अजून का काम होत नाही ? राघोजी भांगरे आदिवासी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे का ? अन्य समाजाला तुम्ही झटक्यात पाच पाच कोटी रुपये देता मग या स्मारकासाठी का देत नाही? असे प्रश्न गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केले

चंद्रभागेतील वाळू उपसा कायमस्वरूपी थांबण्यासाठी या विषयावर चर्चा केली. तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालय म्हणजे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील गैरसोयीबाबतही प्रश्न मांडण्यात आला. गोपाळपूर मार्गे चंद्रभागेत मिसळणारे नगरपालिकेचे मैलामिश्रित पाणी याचाही बंदोबस्त करण्याची विनंती करण्यात आली. 

जुना पुल, वडार घाट, खिस्ते घाट, मसादेवी मंदिर या घाटावर बॅरेगेटिंग करणे गरजेचे आहे, हाही विषय मांडण्यात आला. अतिक्रमणाच्या नावाखाली पंढरपुरातील व्यापाऱ्यांवर अन्याय करू नका,  बाहेरगावचे व्यापारी वारीत येऊन लाखो रुपये पंढरपूरातुन घेऊन जातात व पंढरपुरातील सर्व व्यापारी हातावर हात ठेवतात. त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करायला नको, अशी ही मागणी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षापासून गणेश अंकुशराव यांनी पंढरपुरातील अवैध वाळु उपसा, आदिवासी कोळी जमातीचे प्रश्न, पंढरपुरातील विविध प्रश्न व विशेषतः चंद्रभागेची अस्वच्छता यावर विविध मार्गांनी वेगवगळी आंदोलनं केली आहेत. याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. आजही त्यांनी अतिशय पोटतिडकीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. पंढरपुरातील विविध प्रश्नांवर यावेळी पालकमंत्र्याशी चर्चा झाली.