सोलापूर : जुळे सोलापुरातील कल्याण नगर परिसरात सोमवारी सकाळी दृष्टीपथात आलेल्या हत्त्येप्रकरणी बीएनएस कायदा कलम 103 (1) अन्वये विजापूर नाका पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. अज्ञात आरोपी, अज्ञात कारणातून झालेल्या खून प्रकरणात प्राप्त तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण तसेच गोपनिय माहितीच्या आधारे नागेश अण्णाराव चिक्काळे (वय 35 वर्षे, रा. कल्याण नगर भाग-2, सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी करता, मद्य प्राशन केल्यानंतर झालेल्या भांडणात विनायक कामन्ना हक्के याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झालंय.
01 जुलै 2024 पासून, संपुर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे लागु झाले आहेत. सदरचे तिन्ही कायदे लागू झाल्यानंतर, सोमवारी सकाळी 09.30 वा. च्या सुमारास, आसरा चौकाजवळील, शारदा सहकारी गृह निर्माण संस्था, सोलापूर या संस्थेच्या मोकळया मैदानात एका व्यक्तीचा खून झाला असल्याची विजापूर नाका पोलीस ठाण्यास खबर मिळाली.
घटनास्थळी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ भेटी दिल्या. नवीन कायदे लागू झाल्यापासून, सोलापूर शहरातील पहिलाच खूनाचा गुन्हा असल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्याकडील अधिकारी यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.
घटनास्थळी मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचे नाव विनायक कामन्ना हक्के (वय- 26 वर्षे, रा. मु.पो. जामगांव, ता. मोहोळ) असे असल्याचे निष्पन्न झाले. या मयताच्या अनुषंगाने मृताचा मामा बिळयानिसिध्द यशवंत देशमुख (वय- 40 वर्षे, रा. प्लॉट नं. 60, प्रल्हाद नगर, सोरेगांव, विजापूर रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेकडील तीन पथके वरील गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोउपनि अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने नागेश आण्णाराव चिक्काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सपोनि संजय क्षिरसागर यांनी कसून चौकशी करता, त्याने विनायक कामन्ना हक्के याच्या सोबत, दारु पिल्यानंतर झालेल्या भांडणातून, त्याचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सपोनि/संजय क्षिरसागर, सपोनि दादा मोरे, तसेच त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, अनिल जाधव, कुमार शेळके, इम्रान जमादार, विनोद रजपूत, संदिप जावळे यांनी पार पाडली.
...... चौकट ......
तपास पथकांना करून दिली कामाची विभागणी
गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी, गुन्हे शाखेकडील सपोनि संजय क्षिरसागर, सपोनि दादा मोरे, पोउपनि अल्फाज शेख यांचे तपास पथकांना कामाची विभागणी करुन दिली.
त्यामध्ये,पोउपनि अल्फाज शेख यांना, घटनास्थळी मिळून आलेल्या दारुच्या बाटल्यांच्या अनुषंगाने, आजूबाजूची देशी-विदेशी दारुची दुकाने आणि चायनिज हातगाड्या या ठिकाणी भेटी देऊन, त्या ठिकाणाहून यातील मयत आणि त्या सोबत आणखीन कोणी दारुच्या बाटल्या अगर खाद्यपदार्थ खरेदी केले आहेत काय ? याबाबत गोपनिय माहिती काढणेबाबत सुचित केले.
त्याचप्रमाणे सपोनि क्षिरसागर यांना, मयताचे नातेवाईकांना भेटून त्यांचे विषयी माहिती घेण्यास सुचित केले, तर सपोनि दादा मोरे यांना, घटनास्थळाचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करण्यास सुचित केले.