Type Here to Get Search Results !

द्यावं पत्रकारांना संरक्षण; ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनची पोलीस आयुक्त व राज्य शासनाकडे मागणी


सोलापूर : राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एमडी २४ न्यूज नेटवर्कचे संपादक सैपन शेख यांच्यावर हल्ला झाला. त्यापूर्वीही काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकारांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन (आईरा) चे शहराध्यक्ष विजयकुमार उघडे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडं सोमवारी एका निवेदनाद्वारे केलीय.

पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत, ०७ एप्रिल २०१७ रोजी मंजूर करण्यात आले. यानुसार आता पत्रकार वा प्रसारमाध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास अथवा ५०,००० रूपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आलीय. सध्यस्थितीला पत्रकारांवर होत असलेले हल्ले-मारहाणीच्या घटना पाहता, पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोलापुरात एम. डी. २४ न्यूजचे पत्रकार सैफन शेख, अकोला येथील पत्रकार अजय प्रभे, दैनिक अब तक चे प्रसाद जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते सिध्दाराम नंदर्गी यांच्यासह अनेकांवर गुंड प्रवृत्तीचे, अवैध व्यावसायिक हस्ते-परहस्ते जीवे मारण्याच्या धमक्या देऊन जीवघेणे हल्ले-मारहाण करून पत्रकारितेला दहशतीखाली घेऊ पाहत आहेत, हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनिय आहे.


वर्तमान पत्र काळाचा आरसा म्हणून पाहिला जातो. आज तंत्रज्ञानाचा प्रगतीमुळे सामाजिक प्रतिबिंब दर्शविणारी माध्यमं विविध रूपात येत आहेत. ' भले तरी देऊ xx ची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी ' नाठाळाच्या माथी प्रहार करणारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारितेला हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय, प्रसंगी जीवाला मुकावं लागलं तर नवल वाटू नये, इतकी भयावह स्थिती बनलीय. हल्ले होत असेल तर पत्रकारिता कशी करायची, असा प्रश्न पत्रकारांना भेडसावतोय.

सत्याचा आग्रह धरून पत्रकारितेच्या माध्यमातून सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारांवरील माहिती अधिकार कार्यकर्त्यावरील दिवसेंदिवस होत असलेले वाढते हल्ले, अवैध व्यवसायिकांच्या व्यवसायांना संरक्षण मिळवण्यासाठी दाखल केले जात असलेले खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 

पत्रकारांवर हल्ले करून सत्य दडपू पाहणाऱ्या गुंड प्रवृत्तीला कायद्याच्या चौकटीत  चाप लावण्यासाठी ' पत्रकार संरक्षण ' कायद्याची शत-प्रतिशत अंमलबजावणी व्हावी, पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीच्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, पत्रकार व पत्रकारितेचा संरक्षण केलं जावं, यासह अन्य मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाउद्दीन शेख, सोलापूर शहराध्यक्ष विजयकुमार उघडे यांच्यासह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना दिले.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक, देशाचे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आलं आहे.