Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांचं निधन


सोलापूर :  ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष  अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं १३ जुलै रोजी सायंकाळी अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात थोरले बंधू अजित, पत्नी नीता, मुलगी सुप्रिया असा परिवार आहे. उद्या, रविवारी सकाळी आठ वाजता पत्रकार नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल. मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

गेल्या आठवड्यात ताप आल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. परंतु शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचार सुरु असतानाच अखेर शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अविनाश कुलकर्णी यांनी ३७ वर्षे पत्रकारिता केली. दैनिक केसरीमधून त्यांच्या पत्रकारीतेची सुरुवात झाली. नंतर पुढारी तसेच संचार या दैनिकांसह वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत त्यांनी काही काळ सेवा केली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते. अत्यंत नम्र, मितभाषी, अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती. पत्रकारीतेतील योगदानाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला होता.अविनाश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.