मोहोळ : 'माझ्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही, आता तुला खल्लासच करतो,' असे म्हणून भावाने खोऱ्याने केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झालाय. ही घटना गलंदवाडी येथे शनिवारी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास घडलीय. आप्पासाहेब नारायण सुळे (वय- ५५ वर्षे) असं जखमीचं नांव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांकडं गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गलंदवाडी येथील आप्पासाहेब नारायण सुळे व त्याची पत्नी गंगुबाई मिळून शेतीच्या मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याचा भाऊ विष्णु सुळे त्याच्या शेतातून जाण्यास मनाई करीत 'माझ्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जायचे नाही, आता तुला खल्लासच करतो,' असे म्हणत त्याच्या हातात असलेला दांड्यासहित असलेल्या लोखंडी खोऱ्याने त्याच्या डोक्यात मारून जखमी केले, त्यावर न थांबता व शिवीगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी जखमी अप्पासाहेब सुळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री पुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार थिटे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.