Type Here to Get Search Results !

आषाढी वारी ही स्वच्छतेची वारी...! संत तुकाराम महाराजांची पालखी माळीनगरकडे प्रस्थान करताच शहर स्वच्छ


180 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी 17 टन कचरा पाच तासात उचलला

सोलापूर  : यावर्षी आषाढी वारी निमित्त जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलेले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या सुविधा कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत व तेथील सुविधांची पाहणी करत आहेत. सद्गुरु श्री तुकाराम महाराज यांची पालखी काल सराटी येथे जिल्ह्यात आगमन झाले, त्यानंतर अकलूज येथील सदाशिव माने महाविद्यालयात जिल्ह्यातील पहिले रिंगण झाले. व अकलूज येथेच पालखीचा मुक्काम होता.


अकलूज नगर परिषदेच्या वतीने पालखीच्या पार्श्वभूमीवर अकलूज शहरात पालखी मार्ग सदाशिव माने महाविद्यालय, दिंड्याच्या मुक्कामी ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. त्यामध्ये शेकडो शौचालये, हिरकणी कक्ष, आरोग्य पथक पिण्याचे स्वच्छ पाणी या सुविधांच्या समावेश होता. शुक्रवारी, 12 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता सदाशिव माने महाविद्यालयात नेत्र दीपक असे रिंगण झाले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसेच पालखीचे दर्शन घेण्यासाठी अकलूज शहरातील हजारो नागरिक जय हरी विठ्ठल चा गजर करत उपस्थित होते.


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम अकलूज येथे होता. सर्व सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या होत्या. आज सकाळी पालखी अकलूज येथून पंढरपूरच्या दिशेने निघाली. त्यानंतर अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी पालखीच्या मुक्कामी ठिकाणी तसेच अकलूज शहरातील दिंड्या मुक्कामी असलेल्या ठिकाणची स्वच्छता मोहीम अत्यंत तत्परतेने हाती घेतली.



अकलूज शहराच्या साफसफाईसाठी 180 कर्मचारी 22 घंटागाड्या, 6 पाणी टँकर, 1 मैला टँकरच्या सहाय्याने 25 ते 30 किलोमीटरचे रस्ते गल्लीबोळे, तसेच जिथे जिथे दिंड्या मुक्कामी होत्या अशा सर्व शाळा केवळ चार ते पाच तासात स्वच्छ केल्या. यावेळी 17 टन कचरा गोळा झाला. स्वच्छता झाल्यानंतर सर्व ठिकाणी जंतनाशक पावडर टाकण्यात आली व लॉगिन मशीन ने फवारणी ही करण्यात आली. संपूर्ण पालखी मार्ग व अकलूज शहर स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम राबवत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॅन्ड ग्लोज व मास्क देण्यात आलेले होते.

आषाढी वारी ही स्वच्छतेची वारी असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अत्यंत काटेकोरपणे पालन करून संपूर्ण शहर व पालखी मार्ग स्वच्छ केला. अकलूज नगरपरिषद व मुख्याधिकारी दयानंद गोरे स्वच्छतेच्या कामाबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादाने कौतुक केले. याच पद्धतीने संपूर्ण पालखी मार्ग व मुक्कामी ठिकाणी संबंधित स्थानिक प्रशासनाकडून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.