मोहोळ : गावचा मोठा पुढारी असल्याचे भासवत ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने १.३० लाख रुपयांची खंडणी वसूल करून आणखी रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महेश हनुमंत भोसले (राहणार चिंचोलीकाटी) याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश भोसले सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्वतःचे मोठेपण दाखवत होता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथील मधुर एनमदला (वय-३० वर्ष, मूळ रा. २०१ साई नंदन अपार्टमेंट, रेल्वे लाईन जवळ, सोलापूर) यांच्या कंपनीकडे सरकारी नियमानुसार ८ एप्रिल २०२१ रोजी पासून ते आज पावेतो सर्व परवाने असूनही महेश हनुमंत भोसले यांनी, 'मी गावचा पुढारी आहे, मोठा कार्यकर्ता आहे ,माझं कोणी वाकडे करीत नाही' असे बोलून मधुर एनमदला व कंपनीचे मॅनेजर, अकाउंटंट यास खंडणीच्या मागणी करण्याकरिता फोन द्वारे तसेच व्हाट्सअप मोबाईल वरून फोन करून तसेच नेत्याबरोबरचे काढलेले फोटो, पोलिसांसोबत काढलेले फोटो, कंपनीचे आवाराचे फोटो, कंपनीविरुद्ध केलेल्या अर्जाचे फोटो काढून मधुर एनमदला याला ब्लॅकमेल करीत १.३० लाख रुपयांची खंडणी वसुल केली
तो याच माध्यमातून पुन्हा पैशाची मागणी करीत असल्याची फिर्याद मधुर एनमदला यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलीय. त्यानुसार महेश भोसले याच्याविरूध्द भा. दं.वि. कलम 384,385 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मसपोनि फाळके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.