सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या ' मिष्कीली आणि कविता ' या कार्यक्रमाचे रविवारी,०९ जून रोजी सायंकाळी ०६ वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगर मध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात असल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
सोलापूरकर रसिकांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने ही हास्य कविता आणि मिष्कीलीची पर्वणी देण्यात येणार आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना सर्वदूर अल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. याच वातावरणात हास्याचे फवारे उडवणार्या 'कविता आणि मिष्कील किस्से' ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर सादर करणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने नेहमी अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचाच भाग म्हणून या हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक, कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत ' विंदा एक स्मरणसाखळी ' हा बहारदार कार्यक्रम सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आला. त्याला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमही सोलापुरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला.मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात करण्यात आले.
पावसाळी वातावरणात आयोजित कविता आणि मिष्कीली हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी सोलापूरकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.