मोहोळ : कथित ' नाजूक ' संबंधाची खोटी माहिती दिल्याचे खरे-खोटे करायला गेलेल्या महिलेस दोन महिलांनी दगडाने मारहाण केलीय. ही घटना मोहोळ तालुक्यातील येवती गावात, शुक्रवारी, २८ जून रोजी सायंकाळी घडलीय. या मारहाणीत किरकोळ स्वरूपात जखमी झालेल्या महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात आज पहाटेपूर्वी फिर्याद दाखल केलीय. त्यानुसार दोन महिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येवती येथील ३५ वर्षीय विवाहिता, तिच्या कुटुंबाच्या गाडा हाकण्यासाठी मजुरीचे काम करते. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती कल्पना धनाजी चव्हाण हिने तिच्या पतीस सांगितली होती. या अनैतिक संबंधाविषयी खरे-खोटे करण्यासाठी तो पती-पत्नी कल्पना चव्हाण हिच्या घराकडे गेले होते.
त्या ठिकाणी यासंबंधी विचारणा केली असता, कल्पना चव्हाण हिने त्या महिलेस शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत कल्पना हिने तेथे पडलेला दगड फेकून मारल्याने त्या महिलेच्या डाव्या मांडीस जखम झाली. याप्रकरणी जखमी महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कल्पना धनाजी चव्हाण आणि लक्ष्मी या दोघीविरुद्ध भादवी कलम 336,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस नाईक पाठाडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.