सोलापूर : बँकेत कायमस्वरुपी क्लार्क ज्म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका शिक्षीत तरुणाची त्रिकुटाने ८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केलीय. ही घटना येथील अशोक चौकात चौगुले यांच्या घरी जानेवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान वेळोवेळी घडलीय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार जेलरोड पोलिसांकडे तिघा ठकसेनाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अशोक चौक न्यू पाच्छा पेठेतील रहिवासी व्यंकटेश नागनाथ चौगुले यास भारतीय स्टेट बँक, शाखा जालना येथे कायमस्वरूपी क्लर्क म्हणून नोकरी लावण्याचे निर्मला रणधीर परदेशी आणि अन्य दोघांनी आमिष दाखविले. त्यापोटी व्यंकटेश चौगुले याने, त्यांना आईचे सोने, वडीलांचे रिटायर्डमेंटचे आलेले पैसे, सेव्हिंग केलेले पैसे असे ७,९९,८०० रुपये वेळोवेळी परदेशी यांच्याकडे पाठविले.
गेल्या ४ वर्षात व्यंकटेश चौगुले यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही, अथवा त्यास नोकरीची संधी मिळाली नाही. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, तेही न मिळाल्याने नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला. याप्रकरणी व्यंकटेश चौगुले यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, जेलरोड पोलीस ठाण्यात निर्मला रणधीर परदेशी, रणधीर तुळशीराम परदेशी (रा. ८९, वसुंधरा नगर, न्यु मोंढा रोड, जालना) आणि अब्दुल माजीद खान या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.