Type Here to Get Search Results !

ज्ञान ज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनेच्या लाभासाठी करा अर्ज : मनिषा फुले


सोलापूर : जिल्ह्यात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी, 15 जुलै 2024 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्रीमती मनिषा फुले यांनी केले आहे.

राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय ,शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय व तंत्रनिकेतनामध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी  इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा व ज्यांच्या पालकांचे वार्षीक उत्पन्न रुपये 2.50 लाख पेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र असून क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 51 हजार जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष रुपये 43  हजार रुपये  व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रूपये 38 हजार रुपये  प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे.

या योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 अशा एकूण 450 विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे. तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांनाही त्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लाभ देण्यात येणार आहे. तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कार्यालयाकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे अवाहनही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्रीमती मनिषा फुले यांनी केले आहे.