Type Here to Get Search Results !

आवडीचं क्षेत्र निवडले तर मिळते हमखास यश : पोलिस उप-आयुक्त विजय कबाडे


मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

सोलापूर : आजच्या धावत्या युगात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक क्षेत्र काबिज करण्यासाठी कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे  शिक्षण घेत असताना कोणतेेही दडपण न घेता आपल्या आवडीचं क्षेत्र निवडले तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन पोलिस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी केले.

मराठा सेवा संघ, विद्या विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परिक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवारी, ३० जून रोजी सोरेगाव येथील व्ही. व्ही. पी. तंत्रशिक्षण संकुल  येथे पार  पडला. यावेळी मार्गदर्शन करताना कबाडे बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर विभागीय अध्यक्ष  प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, दत्तामामा मुळे, प्रकाश ननवरे, प्रा. लक्ष्मण महाडिक, उपस्थित होते. 


सत्कार समारंभात व्ही. व्ही. पी. कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी प्रवेशासाठी येणार्‍या अडचणी व उपलब्ध संधी याविषयी माहिती दिली, तर प्रशांत पाटील, डॉ. जी. के. देशमुख यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

कार्यक्रमाची सुरूवात जिजाऊ वंदनेने झाली. त्यानंतर जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  समाजातील 150 गुणवंत विद्यार्थ्यांचा  गौरव सोहळा करण्यात आला. शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष माने यांनी केले. शेवटी प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.