सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर विराजमान होतील, त्यांचं आम्ही सर्वप्रथम अभिनंदन करतो. सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही मिळवून दिलेलं मताधिक्य अभिनंदन आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार लादले जाऊ नयेत, अशी जनसामान्यांची भूमिका होती, मात्र शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला या दोन्ही जागा गमावाव्या लागल्या असल्याची खंत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीप शिंदे यांनी बोलून दाखवलीय.
भारतीय जनता पक्ष समाजातील उच्चभ्रू वर्गाचा पक्ष अशी जनमानसात पक्ष प्रतिमा असताना दिलीप शिंदे यांनी तत्कालीन राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन, स्थानिक नेते लिंगराज वल्याळ, किशोर देशपांडे यांच्यासह तत्कालीन शहर व जिल्हा पातळीवरील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यात सामान्य कार्यकर्ता इथून सुरू केलेला प्रवास अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्षपदापर्यंत कार्य केले होते.
त्यावेळी गावकुसाच्या बाहेरचा मानला जाणारा वर्ग व त्या वर्गातील कार्यकर्ते भाजप पक्षाच्या जवळ फिरकत नव्हते. अशा स्थितीत मागासवर्गातून पुढे आलेली दिलीप शिंदे यांनी निष्ठेने पक्ष कार्य केले होते. मागील एका दशकाचा राजकीय लेखाजोखा पाहता जनमानसातील भावना लक्षात घेऊन, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार दिले जावेत, अशी भूमिका दिलीप शिंदे यांनी खुल्यापणाने व्यक्त केली होती. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते, त्यात शिंदे यांचेही नाव होते.
शिंदे यांनी जनमताचा कानोसा घेत मांडलेली भूमिका योग्य होती, याचा प्रत्यय मतमोजणीनंतर दिसून आला आहे. या मतदारसंघात मागास प्रवर्गातील मोठ्या संख्येने मतदार असल्याने, स्थानिक उमेदवाराला त्याचा प्रत्यक्षपणे लाभ होणे शक्य होते. माझं राम सातपुते यांच्या विषयी कोणताही दुराभाव नाही, परंतु जनभावना लक्षात घेण्याऐवजी भाजपाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे सोलापूरच्या बालेकिल्ल्यात पक्ष पराभूत झालाय, याचं शल्य कायम राहणार आहे, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
संपूर्ण राज्यातील परिस्थिती आणि पुढे आलेला कौल लक्षात घेता, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्याला पुरेसा वेळ देता यावा, याकरिता पदमुक्त करण्याची विनंती राष्ट्रीय अध्यक्षांकडे केलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबरच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून कार्य करावं, त्याचा निश्चितच लाभ होईल, असेही दिलीप शिंदे यांनी शेवटी म्हटलं.