सोलापूर : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकास रिक्षाचालक व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी इच्छित स्थळी नेण्याऐवजी घातक शस्त्रांचा धाक दाखवून जुना कारंबा नाक्याकडील डी मार्ट पर्यंत व तेथून पुढे कोंडीच्या पेट्रोल पंपापर्यंत नेऊन ०१ लाख ०७ हजार रुपयांची जबरदस्तीने लूट केली. त्यापैकी एक लाख पाच हजार रुपये क्यू आर कोड स्कॅन करून घेण्यात आले. ही घटना बुधवारी, ०५ जून रोजी सायंकाळी बाळे ब्रिज जवळील रिक्षा स्टॉप पासून कोंडी दरम्यान घडलीय. या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील कुरुल रोड गणेश नगरातील रहिवासी सुधाकर गणेश गायकवाड (वय-६७ वर्षे) बाळे येथील ब्रिज जवळील मयूर कॅन्टीनयेथील रिक्षा स्टॉपवरून सोलापूर बसस्थानकाकडे जाण्याच्या उद्देशाने रिक्षात बसले होते. त्या रिक्षाचालक व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी संगणमत करून त्यांच्या जवळील लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
रिक्षा तुळजापूर रोडवरील डीमार्ट समोर रस्त्याचे बाजूला थांबवून त्यांच्या जवळील ०२ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ती रिक्षा कोंडी येथील पेट्रोलपंप येथे घेऊन जाऊन पेट्रोल पंप येथून दोन वेगवेगळे क्युआर कोड घेऊन फिर्यादीचे फोनपे वरून जबरदस्तीने स्कॅन करून ०१ लाख ०५ हजार ट्रान्सफर करून घेतले. अशा प्रकारे सुधाकर गायकवाड यांच्याकडील १,०७,००० रूपये जबरदस्तीने काढून घेतले.
याप्रकरणी सुधाकर गायकवाड यांनी अज्ञात क्रमांकाचा रिक्षाचालक व त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी त्या तिघाविरुद्ध गुरुवारी सकाळी भादवि ३९२,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.