सोलापूर : प्रेमात अडसर ठरणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपावर न्यायालयात अॅड. रियाज शेख आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार याच्या वतीने केलेला युक्तिवाद मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. के. जंगम यांनी आरोपी गाझी जहागीरदार याची निर्दोष मुक्तता केलीय.
या घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की, ०७ नोव्हेंबर २०१३ रोजी फिर्यादी डॉ. फारूक नजीर महागामी (रा. सोलापूर) हे त्यांचे बसवनगर येथील दवाखाना बंद करून विजापूर रोडने सोलापूरच्या दिशेने येत असताना रात्री १०: ४५ वा. च्या सुमारास देशमुख वस्तीजवळ आले असताना पाठीमागून एका मोटार सायकलवर माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघे यांनी डॉक्टरला अडवून, 'त्यास तू माझ्या प्रेम प्रकरणांमध्ये मध्ये का येतो' असा जाब विचारून हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने त्याच्या डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्यांना बाजूस असलेल्या झुडपामध्ये फेकून निघून गेले होते.
त्यानंतर डॉ. फारूक महागामी यांनी मोबाईलवरून ही घटना त्यांच्या भावंडांना कळवून व पुढील उपचाराकरिता दवाखान्यांमध्ये जाऊन त्यानंतर मंद्रूप पोलीस स्टेशन येथे माजी नगरसेवक गाजी जागीरदार व त्यांच्या २ साथीदारांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता, सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी सोलापूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. के. जंगम यांच्या कोर्टामध्ये झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पंच, फिर्यादीला जखमीला तपासणारे डॉक्टर, तपासी अधिकारी असे ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले होते. खटल्याच्या अंतिम युक्तीवादावेळी आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्यावतीने युक्तिवाद करत असताना अॅड. रियाज शेख यांनी आरोपीविरुद्ध खोटी केस केलेली आहे, कोणताही नेत्र साक्षीदार मिळून आलेला नाही, असं न्यायालयाच्या प्रारंभी निदर्शनास आणले.
तपासामध्ये घटनास्थळ पंचनामांमध्ये व फिर्यादी जवाबामध्ये तफावत आहे, फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे, आरोपीचे प्रेम संबंध असल्याचे सबळ पुरावे निर्माण कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले नाहीत, साक्षीदारांनी त्यांच्या साक्षीमध्ये दिलेला जबाब हा विसंगती निर्माण करतो व घटना घडल्या बाबत संशय निर्माण करणारा असल्याचे न्यायालयासमोर केलेल्या युक्तीवादात एडवोकेट शेख यांनी म्हटले.
घडलेल्या घटनेबाबत स्पष्ट पुरावा आरोपीनेच मारल्याचे दिसून येत नसल्याने आरोपीस निर्दोष मुक्तता करावी, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. के. जंगम यांनी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केले.
या खटल्यात आरोपी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या तर्फे अॅड. रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. माधुरी पाटील यांनी काम पाहिले.