अधिकृत अन खात्रीलायक असेल तरच करावी गुंतवणूक !
सोलापूर : आर्थिक घोटाळ्याचे फॉरेन्सिक अकाउंटींग करणे महत्वाचे असते आणि जगातील पहिला फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून चाणक्यची ओळख आहे. असे आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये " आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग '' या पुस्तकाच्या लेखिका डॉ. अपूर्वा जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने लोकमान्य टिळक सभागृह, अॅम्फी थिएटर मध्ये शनिवारी, २९ जून रोजी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ही मुलाखत घेतली होती. यावेळी सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या देशात अनेक मोठे आर्थिक घोटाळे उघडकीस आले. त्या घोटाळ्यावर अभ्यासपूर्ण तपास आणि त्याचे ऑडिट करण्याचे म्हणजेच फॉरेन्सिक अकाऊंटींग करण्याची जबाबदारी मिळाली, त्यावरूनच या सर्व घोटाळ्यांचा आणि त्यामधील तपासाबाबत आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग नावाचे पुस्तक तयार करण्यात आल्याचे लेखिका डॉ. अपुर्वा जोशी यांनी सांगितले.
प्रत्येक घोटाळ्याचे ऑडिट करत असताना नवीन अभ्यास करूनच दिशा ठरवावी लागते. आर्थिक साक्षरता महत्वाची तसेच सायबर सतर्कताही आवश्यक आहे. असेही डॉ. अपूर्वा जोशी यांनी सांगितले.
पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अभ्यासपूर्ण आणि पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या तपासाच्या अनुभावावरून अभ्यासपूर्ण असे प्रश्न विचारले आणि त्याला अपूर्वा जोशी यांनी तेवढ्याच अभ्यासपूर्णपणे उत्तर दिले. काही प्रश्नांच्या उत्तराला उपस्थितीत नागरीकांनी भरभरून दाद दिली. कायद्याची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव शर्मिष्ठा वालावलकर यांनी प्रश्नातून मांडले.
कायदे सक्षम आहेत, परंतु इतर गुन्ह्यापेक्षा आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे असे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी केले. त्यानंतर अविनाश महागांवकर यांनी लेखिका अपूर्वा जोशी, पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांचा परिचय करून दिला. त्यानंतर अध्यक्षा रेणुका महागांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले, तर कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. मंच सजावट गुरू वठारे यांनी केली. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी पृथा हलसगीकर, अभय जोशी, विनायक होटकर, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे, डॉ. शिवरत्न शेटे, दत्ता गायकवाउ, डॉ.श्रीकांत येळेगांवकर, डॉ. नसिमा पठाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.