नदीवरील पूरात तिघे तरुण गेले वाहून; एक बेपत्ता
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात झालेल्या पावसामुळे कासेगांव-उळेगांव रस्त्यावर नदीवर पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यापैकी दोघांना स्वतःला वाचवण्यात यश आलंय. पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर कदम याची दुचाकी अग्निशमन दलाच्या टीमने टाकलेल्या गळाला लागलीय, मात्र दुपारी १२.३० वा. पर्यंत पार पडलेल्या शोध मोहिमेत हाती लागला नसल्याचे दिसून आलंय.
गेल्या तीन दिवसात कासेगांव परिसरात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे रानं चिंब-चिंब भिजून छोटे-छोटे नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अशात मंगळवारी सकाळपासून पाऊस थांबला होता. दुपारनंतर आभाळात ढगांनी गर्दी केली होती. सायंकाळनंतर सोसाट्याचं वारं सुरु झालं अन् रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला.
रात्रीच्या या पावसानं गावच्या नदीवरील पूलावरुन पाणी वाहू लागलं होतं. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी पाण्यात घातलेले तिघे जण दुचाकीसह वाहून गेले. ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले.
कासेगांवच्या नदीवर गतवर्षी जूना पूल काढून नव्यानं पूल बांधण्यात आलाय. नव्यानं बांधण्यात आलेला अदूरदर्शीपणानं बांधण्यात आलाय. जून्या पूलाच्या उंचीपेक्षा जवळपास ५ फूटापेक्षा अधिक खोली करून बांधण्यात आल्यानं ग्रामस्थांनी त्यास प्रारंभापासून त्यास विरोध दर्शवलाय. तो चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे, त्यातच ही दुर्घटना घडलीय.