(प्रतिकात्मक छायाचित्र)
सोलापूर : यावर्षी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीपासून ते अगदी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळ्याचे संकट मोठ्या प्रमाणात जाणवले. उन्हाच्या संकटापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांनी या काळात थंड पाणी, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यावर मनसोक्त ताव मारला. अन्न प्रशासनाच्यावतीने या काळात बाटलीबंद पाणी, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. या काळात अन्न प्रशासनाच्या वतीने या दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या अन्न पदार्थांचे ०९ नमुने तपासणीसाठी घेतल्याचे सांगण्यात आले.
मार्च ते मे या कालावधीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली आहे. या कालावधीत लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया असतानाही अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळत त्यांचे तपासणीचे मूळ काम केले आहे. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे २ नमुने घेण्यात आले आहेत. आइस्क्रीम आणि डेझर्टसचे ४ नमुने घेण्यात आले आहेत. बेकरी पदार्थ व शीतपेयांचे ३ नमुने असे एकूण ९ नमुने घेण्यात आल्याचे सोलापूर शहराचे अन्न सुरक्षा अधिकारी साहेबराव देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
घेतलेले नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर नमुने दोषी असलेल्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याचा कालावधी मोठा असल्याने नागरिकांनी उन्हाचा तडाखा व उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेये, आइस्क्रीम, मठ्ठा, लस्सी, ताक या पदार्थांवर मनसोक्त ताव मारलेला आहे. आपण खात असलेले पदार्थ किती शुध्द आहेत ? याबद्दल अनेकांच्या मनात शंकाही आली होती. तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांच्या अहवालानंतरच सर्व गोष्टी उघड होणार आहेत.