सोलापूर : अवैध वाळू वाहतुकीत गुंतलेले ट्रॉलीसह ०२ ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त करून उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले होते. ते दोन्ही ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी चोरी झाल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास एक वर्षानंतर ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आलंय. ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने संजय मनोहर गावडे (वय-३२ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. मु.पो. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) याच्यासह चौघांना गजाआड केलंय.
सदर बझार पोलिसांकडे गु.र.नं. ४६६/२०२३ भादंवि कलम ३७९, ३४, खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम कलम २२ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात जुलै २०२३ मध्ये, महसूल विभागाने, अवैध वाळूची वाहतूक करणारे ०२ ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून, उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथे ठेवले होते. रात्रीचे वेळी सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाले होते.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पो.उप.नि. अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, संजय मनोहर गावडे व त्याचे साथीदार हे, उत्तर तहसील कार्यालय येथून ट्रॉलीसह चोरी केलेले दोन ट्रॅक्टर, विल्हेवाट लावण्याकरिता सी.एन.एस. हॉस्पीटल ते जुना पुना नाकाकडे जाणाऱ्या रोडलगत मोकळ्या मैदानात उभे असल्याचे समजले.
प्राप्त माहितीचे आधारे, पो.उप.नि. अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकाने, सापळा रचून इसम नामे संजय मनोहर गावडे, आडप्पा शिवाप्पा कोळी (वय-३० वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मु.पो. तिऱहे, ता. उत्तर सोलापूर), अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड (वय-२३ वर्षे, व्यवसाय - ड्रायव्हर, रा. मु.पो.तिर्हे) आणि आनंद उर्फ बिरु नामदेव गाडेकर (वय २१ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर, रा.मु.पो. पाथरी) यांना दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले.
त्या चौघांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, मुख्य आरोपी संजय मनोहर गावडे याने, वरील नमूद साथीदारांसह मिळून दि. ०२ जुलै २०२३ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथून, महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानंतर, या आरोपींकडून त्या गुन्ह्यात चोरीस गेलेले, महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करणेत आले. तसेच, सदर गुन्हा करताना सर्व आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची विस्टा कार, बुलेट मोटार सायकल असा एकूण रु. ९,९५,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप.नि. अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दीक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, वसिम शेख, धिरज सातपुते, आबासाहेब सावळे, सतिश काटे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.