Type Here to Get Search Results !

... 'आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' च्या लेखिका अपूर्वा जोशींची शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर घेतील मुलाखत


सोलापूर : देशभरात गाजलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम 'आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' या पुस्तकाच्या माध्यमातून करणारी सोलापूरची सुकन्या लेखिका डॉ. अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर घेणार असून शनिवारी, २९ जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये सायंकाळी ०६.३० वा. हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

गेल्या १०० वर्षात कोट्यावधी रूपयांचे आर्थिक घोटाळे उघड झाले, हे आर्थिक घोटाळे कसे झाले आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे. याचा सखोल अभ्यास आपल्या पुस्तकाच्या रूपाने मांडणार्‍या सोलापूरची कन्या डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी यांचे 'आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग' नावाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आणि लेखिका अपूर्वा जोशी यांचा सत्कारही करण्यात आला. 

सोलापूरमधील सुप्रसिध्द फिजिशियन डॉ. प्रदीप जोशी यांची ही कन्या असून सोलापूरच्या या प्रतिभावंत कन्येचा आणि तिच्या पुस्तकाची ओळख व्हावी, तसेच आर्थिक घोटाळ्यांवर प्रकाश टाकताना आणि त्याचे पुस्तकात रूपांतर करतानाचा प्रवास सोलापूरकरांसमोर यावा, या हेतूने त्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 

हल्ली नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर यांच्याकडून ही मुलाखत घेतली जाणार आहे. शर्मिष्ठा घार्गे-वालावलकर यांनी यापूर्वी सोलापूरला सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर सेवा केली आहे. त्यांनी येथे कर्तव्य बजावत असताना शहरातील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा सखोल तपास केला, हे सर्वश्रुत आहेच, असंही यावेळी सांगण्यात आले.

म. सा. प. शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने असे नवनवीन उपक्रम सोलापूरकरांसाठी घेण्यात येतात. नुकतेच मागील आठवड्यात ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगांवकर यांचा मिश्किली आणि कवितांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसानंतर जिल्हा कारागृहातील बंदीजनांसाठी महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम घेऊन आगळा-वेगळा उपक्रम करण्यात आला. त्यातून कारागृहातील बंदीजनांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. 

सोलापूरमधील सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने करण्यात येते. त्या अनुषंगाने हा अनोखा आणि आगळा-वेगळा असा डॉ. अपूर्वा जोशी यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी सोलापूरकर रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे उपाध्यक्ष प्रा. दिपक देशपांडे, प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे, गुरू वठारे यांनी केले आहे.