Type Here to Get Search Results !

' शहर मध्य ' मधून आडम मास्तर जिंकतील, यासाठी जातीने लक्ष घालणार : नाना पटोले यांचे सूतोवाच


मा. क. प. प्रतिनिधी मंडळाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट

सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतली, भाजपचा पराभव करण्याकामी भरीव योगदान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत ' शहर मध्य ' मधून आडम मास्तर जिंकतील, यास्तव जातीने लक्ष घालणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे देशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सोमवारी,  २४ जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने नाना पटोले याची मुंबईत भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील घटक पक्षाच्या भरीव कामगिरीबद्धल माकप च्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन नाना पटोले यांचं हार्दिक अभिनंदन केले. प्रतिनिधी मंडळात डॉ. उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, आमदार विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, किरण गहला आदींची उपस्थिती होती. 

आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामावून घेतले जाईल. माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासोबत मी विधी मंडळात काम केलेला आहे. कामगार-शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे, यासाठी ते सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून जिंकतील, यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार नाना पटोले आश्वासन दिले. 

लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे नाना पटोले यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत  एक तास सांगोपांग चर्चा केली. 

माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या सोलापूर : शहर मध्य, ठाणे : डहाणू-तलासरी, विक्रमगड-शहापूर, नाशिक : नाशिक पश्चिम ,  कळवण, दिंडोरी, इगतपुरी, अहमदनगर : अकोले, बीड : माजलगाव, परभणी : पाथरी, नांदेड : किनवट या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.