Type Here to Get Search Results !

जलकन्येचा मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प



सोलापूर : येथील जुना पुना नाका, वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी, ''मधुमंगल" मधील रहिवासी श्रीमती भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलाय. त्याच वेळी त्यांनी नेत्रदानाचीही इच्छा व्यक्त करून तोष्णीवाल नेत्रपेढीलाही लिखीत स्वरूपात कळवलीय.

कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं, वैद्यकीय क्षेत्रातील नवं-नवं संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी अवयवदानही सहजशक्य होऊ लागलंय. त्यातच आपल्या मरणोपरांतसुद्धा या देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी भावी डॉक्टरांना उपयोग व्हावा, असा सकारात्मक विचार करून मरणोत्तर नेत्रदान-देहदान करण्याचा संकल्प कळविणारेही समाजात अनेक जण आहेत.

अशा अनेकात एक नांव सोलापुरातून वाढलंय, ते नांव भक्ती जाधवांचं ! प्रा. मधु जाधव यांच्या सुकन्या भक्ती जाधव. भक्ती जाधव ही एक व्यक्तिच नाही तर विचार म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जातंय. त्या सोलापूर जिल्ह्याच्या पटलावर ' जलकन्या ' म्हणून सर्वदूर परिचीत आहेत. मधल्या काळात तलावाचा गाळ उपसून शेतकऱ्यांना देणाऱ्या लोकमंगल फाऊंडेशनच्या उपक्रमाप्रमाणे तलावाच्या गाळ उपश्यातून सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला ' काळी आई ' अशी ओळख करून देण्यात भक्ती जाधवांचं मोठ योगदान आहे.

अवघं सोलापूर वा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जलचळवळ, वाचनालय चळवळीबरोबरच अवयवदान मरणोत्तर नेत्रदान- देहदान चळवळ सर्वदूर पसरावी,जनजागृती व्हावी, यासाठी गेली अनेक त्या रात्रंदिवस मेहनत घेताहेय. त्यांना  गरज आहे, ती ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाणाऱ्यांची... ! तर त्यांच्या  धडपडीला मोलाची साथ मिळणार आहे.

त्यांनीच मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प करुन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांना कळविलंय. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मरणोत्तर देहदान संकल्प ओळखपत्र देऊ केलंय. ते भक्ती जाधव यांनी सामाजिक माध्यमावर सामाईक केलंय.