Type Here to Get Search Results !

सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


सोलापूर : इयत्ता पहिली ते दहावी शिक्षणपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे. आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील  अनुसूचित जमातीच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी केलं आहे. 

शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिकांच्या शाळामधील अनुसूचित जमातीच्या इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ग्रामविकास व नगर विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे.

या योजना राबविण्यासाठी शाळेतील‍ मुख्याध्यापक यांनी शासन निर्णयातील अटी व शर्ती पुर्ण करणारे पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नमुद अर्जाच्या नमुन्यात गट शिक्षण अधिकारी तसेच महानगरपालिका हद्दीतील शाळा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे तात्काळ सादर करावेत.

तसेच गट शिक्षण अधिकारी व महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी यांनी सर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, यांच्याकडे सादर करावेत.  शिष्यवृत्ती योजनेपासून एकही पात्र अनुसूचित जमातीचा विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिका नगरपरिषद व महानगरपालिकांच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी. 

या योजनेच्या माहितीकरिता प्रभारी सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण), विशाल सरतापे. मो.नं.8668774254, व लिपिक टंकलेखक चंद्रकांत वाघमारे मो.नं.9403493763 अथवा ई-मेल-posolapursdist@yahoo.com वर संपर्क साधावा असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, धनंजय झाकर्डे यांनी कळविलं आहे.