सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या 16 गुन्ह्यात देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी सह 5 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मंगळवार व बुधवार या दोन दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टी बॅरलमध्ये 100 लिटर रसायन व बारा प्लास्टिक बॅरल मध्ये 2400 लिटर रसायन असा 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला.
या पथकाने गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण (वय- 39 वर्षे) याच्या ताब्यातून दोन लोखंडी भट्टी बॅरलमधील 200 लिटर रसायन व 200 लिटर क्षमतेच्या दहा प्लास्टिक बॅरल मधील दोन हजार लिटर रसायन व एका रबरी ट्यूब मधील 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 93 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने गुळवंची तांडा येथील विशाल सुभाष चव्हाण (वय- 25 वर्षे) याच्या ताब्यातून 950 लिटर गुळमिश्रित रसायन व तीनशे लिटर हातभट्टी दारू असा 66 हजार 50 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला. तसेच गुळवंची तांड्याच्या उत्तरेस सरकारी ओढ्याकाठी असलेल्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर धाड टाकून त्या ठिकाणी 2300 लिटर रसायन जागीच नाश केले. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
बुधवारी राबविलेल्या मोहिमेत भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील बस स्टँड समोरील पत्रा शेडमध्ये कमलाबाई थावरू राठोड (वय-78 वर्षे) या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच बुधवार पेठ येथील हॉटेल साईच्या बाजूला असलेल्या पत्रा शेडमधून सनी नागनाथ भोसले, वय 40 वर्षे याच्या ताब्यातून पाच प्लास्टिक कॅन मध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त करून दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात सतीश व्यंकटेश येनगंटी (वय - 38 वर्षे) याच्या ताब्यातून पाच लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त केली, तसेच विठ्ठल जगन्नाथ अलमल वय 58 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगांव येथील नागम्मा श्रीशैल जमादार (वय - 44 वर्षे) यांच्या राहत्या घरातील पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला असता 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्लू व्हिस्की ब्रँडच्या 35 बाटल्या, 90 मिली क्षमतेच्या देशी दारू टॅंगो पंचच्या 10 बाटल्या व बहात्तर लिटर हातभट्टी दारू असा एकूण 13,570 किमतीचा देशी-विदेशी दारू व हातभट्टी दारूचा साठा जप्त करून गुन्हा नोंदविला.
याच पथकाने दाजी पेठ दत्तनगर परिसरातील यल्लाप्पा नीलकंठ मादगुंडी (वय-52 वर्षे) याच्या ताब्यातून एक लिटर क्षमतेचे ताडीने भरलेले 64 प्लास्टिक पाऊच जप्त करून त्याचे विरुद्ध गुन्हा नोंदवला.
दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने जुना पुना नाका परिसरात दैवशीला अशोक मोरे (वय - 45 वर्षे) या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक घागर व प्लास्टिक बकेटमध्ये साठवून ठेवलेली 55 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने जवळकर वस्ती येथे ललिता प्रभाकर कांबळे (वय - 49 वर्षे) या महिलेच्या ताब्यातून 40 लिटर हातभट्टी दारू जप्त केली.
सीमा तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक मानसी वाघ यांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास विडी घरकुल कुंभारी परिसरात नागनाथ चंद्रय्या महेशन (वय-49 वर्षे) याच्या ताब्यातून 20 लिटर हातभट्टी दारू व भागम्मा अमोगसिद्ध बाराचारे वय 39 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 18 लिटर हातभट्टी दारू व 650 मिली क्षमतेच्या 24 फ्रुट बिअर च्या बाटल्या जप्त केल्या.
दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे दशरथ महिपती शिंदे याला त्याच्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH13 DZ 5857 वरून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 30 बाटल्या व मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्की च्या 15 बाटल्या अशी देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले.
बार्शी तालुक्यातील भालगांव येथे लक्ष्मण रामहरी दराडे या इसमास हिरो स्प्लेंडर MH13 DH 3849 वरून इम्पेरियल ब्लू विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, अंजली सरवदे, मानसी वाघ, सुरेश झगडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन वनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, योगीराज तोग्गी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
जप्त मुद्देमालाचे वर्णन
या विशेष मोहिमेत 823 लिटर हातभट्टी दारू, 7950 लिटर गुळ मिश्रित रसायन, साडेसहा लिटर देशी दारू, 19 लिटर विदेशी दारू, 64 लिटर ताडी व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.