Type Here to Get Search Results !

बकरी ईदच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसाठी करावं सर्वांनी सहकार्य : पोलीस आयुक्त एम. राजकुमार


सोलापूर : बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाचेवेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत. उपरोक्त सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी सहकार्य करावं, अशी सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. बकरी ईद पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक, गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही, याची सक्त नोंद घ्यावी. गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

बकरी ईद उत्सव चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी, १३ जून रोजी ११.०० वा. पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लीम धर्मगुरु, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्थ, शहारातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्थ यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार बोलत होते.

या बैठकीची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसन केले.

उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परिसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. नियमांचे पालन करावे, योग्य बदोबस्त नेमू, असे सांगून बकरी ईद निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) अशोक तोरडमल,  विभाग-२ - अजय परमार, यशंवत गवारी (वाहतुक शाखा), श्रीमती. प्रांजली सोनवणे (गुन्हे शाखा), तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी मठपती, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, व सहा आयुक्त पशुसवंर्धन अधिकारी विशाल येवले, सोमपा पशु चिकित्सक भरत शिंदे तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधु उपस्थित होते.

बैठकीत करण्यात आलेल्या सूचना

▶️ कोणतीही खाजगी व्यक्ती अथवा कोणत्याही संघटनांचे कार्यकर्ते यांनी गोवंशीय जनावरांची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्वतः अवैधपणे वाहन अडविणार नाहीत. 

▶️ कुर्बानी नंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणतीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

▶️ स्वच्छतेचे पालन करुन रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

▶️ नागरिकांनी कोणत्याही स्थितीत चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे. सोशल मिडीयाद्वारे कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करुन जातीय सलोखा अबाधित राखावा. 

▶️ एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष येथे त्वरीत माहिती द्यावी. 

▶️ कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य/वक्तव्य केले जाणार नाही, याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. 

▶️ बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाचेवेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत. उपरोक्त सुचनांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आले.