अक्कलकोट : तालुक्यामधील पितापूर हे हरणा नदी काठी वसलेले गाव. ऑगस्ट २०२२ साली या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे पिताभर या गावात मयत झालेल्या एका व्यक्तीची अंत्ययात्रा हरणा नदीतून पलीकडे नेण्यात आली. तिथं शासनाने पूल बांधला आहे. या नव्या पूलावरून वाहतूक सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जातोय.
०९ ऑगस्ट २०२२ रोजीच्या घटनेत, पितापूर येथील भंडारी नामक व्यक्तीचं निधन झालं होतं. त्याची अंत्ययात्रा निघाली, त्यावेळी हरणा नदी दुथडी भरून वाहत होती. ती अंत्ययात्रा गावकऱ्यांनी जणू त्यांच्या पाचवीला पूजल्या पद्धतीगत पैलतिरावावर नेली. मृताला पाण्यातून पलिकडं घेऊन जाण्याचं काम मोठ्या संकटाला सामना करण्यासारखं होतं. ग्रामस्थानी जोखीम स्वीकारत नेलेल्या अंत्ययात्रेचं चलचित्रण त्या गावचे सुपुत्र तथा पत्रकार इमरान सगरी यांनी सोशल मिडीयावर शेअर केलं अन् मानवी मन हेलाऊन टाकणारं दृश्य वाऱ्यासारखं सर्वत्र पसरलं होतं. राजकारण आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या सर्वत्र त्या व्हिडिओची चर्चा होऊ लागली, या ठिकाणी पूल व्हावा, अशी जवळपास पन्नास वर्षांपासून गावकऱ्यांची मागणी होती.
अखेर ती मागणी प्रशासनाने पूर्ण केली. शासनाने पूल बांधण्याचा विचार केला. अखेर हा पूल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेला आहे. हरणा नदीवरील नव्या पुलावरून आता वाहतूक सुरू झालीय. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.