सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा प्राणघातक शस्त्राने सपासप वार करून तिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिध्दू किसन हराळे (रा.हराळेवाडी) याचेविरुध्द भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आय. ए. शेख यांनी आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद व त्या पुष्ठर्थ सादर केलेले न्याय निवाडे ग्राह्य धरून आरोपीस निर्दोष मुक्ततेचे आदेश दिले.
यात हकिकत अशी कि, मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील सिध्दू किसन हराळे याचा सन २००४ मध्ये मनिषा हीजबरोबर विवाह झाला होता. उभयतांना सुजाता, काजल आणि समर्थ अशी तीन अपत्य असून, सिध्दू हराळे याची दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे शेतजमीन असल्याने ते सहकुटुंब बंडगर वस्ती येथे वास्तव्यास होते.
२४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी सिध्दू हराळे व त्याची पत्नी मनीषा, म तिची भाची सुश्मिता बाळंत झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते. त्यावेळी मनिषाने, तिचा नवरा सिध्दू हराळे गेल्या २ महिण्यापासून दुसऱ्याच्या शेतात कामाला गेल्यावर माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण-शिवीगाळी करीत असल्याचे तक्रार मोठा भाऊ खंडू तात्याबा माने याच्याकडे केली होती.
२५ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी खंडू माने हा घरी असताना सिध्दु हराळे याने त्यास भ्रमणध्वनीवर फोन करून त्यांने , 'मी तुझे बहीणीला जिवे ठार मारले आहे' अशी कबुली दिली. खंडूने ह्या प्रकाराबाबत त्याचे आई- वडील, पत्नी, बहीण यांना सांगीतले. त्यानंतर ते सर्वजण मिळून मौजे गुंजेगाव येथील बंडगर वस्ती येथे मनिषा यांचे वस्तीवर दुपारी ०२.४५ वा चे सुमारास गेले, तेव्हा त्यांच्या पत्राशेडचे दरवाजासमोर मनिषा निपचीत पडली होती. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले. खंडू माने आरोपीविरुद्ध मनीषाच्या खून केल्याची मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती. यात आरोपीस घटनास्थळावरून अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलीसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
आरोपीविरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयतासोबत अनैतिक संबंध असलेला सिध्दू पडवळे याची सरकार पक्षाने नोंदवलेली साक्ष महत्वाची होती, परंतु आरोपीतर्फे घेतलेल्या उलटतपासात तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
आरोपीतफे अॅड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जवाब विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध असलेला साक्षीदार हा मृतावर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. त्या पुष्ठर्थ सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सिध्दू किसन हराळे याला निर्दोष मुक्त केलं.
या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. किरण सराटे, अॅड. वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, अॅड. शैलेश पोटफोडे, अॅड श्रेयांक मंकणी यांनी तर सरकारतर्फे अॅड. कविता बागल यांनी काम पाहिले.