Type Here to Get Search Results !

"लोकराजा राजर्षी शाहू महाराज "




राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे व्यक्तीमत्व लाखो नव्हे करोडो लोकांत उठून दिसावे असे होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सारखा थोर मानवतावादी राजा शतकातच नव्हे तर सहस्त्रकात एकदा दुसराच होत असतो. शिवछत्रपतींबद्दल अनेकदा असे जाणवते की, त्यांच्या चरित्राचा जसजसा अभ्यास करत जावे, तसतसे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नवनवीन पैलू दृष्यमान होत जातात. शाहू छत्रपतींबाबतीतही त्यांच्या चरित्राच्या अभ्यासकांना हाच अनुभव येतो. त्यांच्या बहुरंगी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या काही ठळक पैलूंचा परामर्श घेऊया.


अजब शरीरसामर्थ्याचा भीमकाया तेजस्वी पुरुष इतिहासात अजब शरीरसामर्थ्याचा पुरुष म्हणून शाहू महाराजांकडे पाहिले जाते. त्या काळातही त्यांची तशी ख्याती होती. सुप्रसिद्ध साहित्यिक ग त्र्यं माडखोलकरांनी महाराजांना अनेकदा पाहिले होते. त्यांनी म्हटले आहे, " आपल्या पौराणिक ग्रंथांतून वर्णन केलेला भीमकाय, तेजस्वी आणि उग्र असा पुरुष श्रेष्ठ मी त्यापुर्वी व त्यानंतर आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही "


नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर हे कोल्हापूरचेच. त्यांनी महाराजांना जवळून पाहिले होते. ते आपल्या आठवणीत लिहितात " राजर्षी शाहू महाराज दिसण्यात ओबडधोबड, पण देहाने दणकट, मनाने मजबूत होते. त्यांचा पोलादी देह सव्वा सहा फूट उंच नि तसाच रुंदही होता. भव्य धिप्पाड शरीरयष्टी प्रमाणेच त्यांचा स्वभावही उदार , उमदा होता. श्यामल वर्ण , भेदक डोळे, भरदार देहयष्टी ह्यामुळे त्यांचे प्रचंड व्यक्तीमत्व हजार लोकांत उठून दिसत असे. परका माणूस जवळ येण्यास थोडासा कचरायचाच . त्यांचा आवाजही आभाळ गडगडल्याप्रमाणे भरदार, मोठा होता. कुस्ती आणि शिकार ह्या दोन गोष्टींचा त्यांना दांडगा शौक , त्यांच्या अंगी ताकदही तशीच प्रचंड होती. शिकार करण्यात व घोड्यावर बसण्यात अखिल महाराष्ट्रात त्यांच्या तोडीचा कोणी नव्हता. चार बैलांची मोट एकट्याने ओढण्याचे तर त्यांना काहीच वाटत नसे. सावज अंगावर घेऊन त्याची शिकार करण्याची त्यांना भारी हौस."


आपल्या अफाट शक्तिसामर्थ्यामुळे शाहू महाराज त्या काळात आणि आजही दंतकथा बनून राहिले आहेत. कोल्हापूर - महाबळेश्वर हे अंतर एका दमात घोडेस्वारीने काटणारे महाराज; भरधाव मोटार आपल्या अंगातील 'रगी ' ने रोखून धरणारे महाराज; पागेला आग लागली तेव्हा मजबूत घोडी खांद्यावर घेऊन त्यांना आगीतून बाहेर काढणारे महाराज; खवळलेल्या वाघावर नि:शस्त्र चाल करून केवळ त्याचा गळा घोटून ठार मारणारे महाराज; कुस्तीच्या आखाड्यात पैलवान नाठाळपणा करु लागले, तर त्यांच्या लांगेत हात घालून त्यांना अलगद उचलून बाजूला ठेवणारे महाराज; क्लोरोफाॅर्म न घेताच दिड दोन तासांचे टॉन्सिलचे ऑपरेशन डॉक्टरांकडून करवून घेणारे महाराज; अशा महाराजांच्या अचाट शक्तीच्या कथा त्यांच्या चरित्रात ही नोंदल्या गेल्या आहेत. महाराजांच्या या कृत्यांनी त्या काळातील लोकही अचंबित होत असत.

तत्त्वज्ञ लोकराजा

शाहू महाराजांची साधी राहणी, साधी बोली पाहून अनेकांना ते युरोपियन संस्कृती व ज्ञान यांचा परिचय नसणारे अशिक्षित गृहस्थ वाटत. वास्तविक त्यांना शिक्षण देणारे गोखले, सबनीस, फ्रेजर आदी व्यक्ती निष्णात शिक्षक व पंडित होत्या. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला होता. इंग्रजी साहित्य, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. ते उत्तम अस्खलित इंग्रजी बोलत . पण केंव्हा तरी भेटणाऱ्या परक्या इसमास महाराज राकट आणि अडाणी वाटत. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, सुशिक्षितपणाचा टेंबा मिरविणारी पांढरपेशी मंडळी महाराजांच्या भेटीस गेली की, ते जाणूनबुजून हेंगाडयासारखे वागत व मुद्दाम हेंगाडी भाषा बोलत, पण याच 'हेंगाडी' रुपाच्या मागे अनेक गंभीर विषयांचा अभ्यास केलेली केवढी मोठी व्यक्ती लपलेली आहे. याची फक्त त्यांच्याशी वैचारिक व तात्त्विक चर्चा करणाऱ्या विद्वानासच प्रचिती येत असे. 

"धर्मावर श्रद्धा, पण अंधश्रध्देस नकार "

 शाहू महाराजांची ईश्वरावर व धर्मावर श्रद्धा होती. तसेच त्यांनी आर्य समाजाचे अनुयायित्व स्वीकारले होते. तरी मुर्तीपुजेचा त्याग केलेला नव्हता. हिंदूंच्या देवळा प्रमाणे मुस्लिमांच्या दर्ग्यालाही जात. राजवाड्यात व संस्थानात पुर्वापार चालू असलेले धर्मविधी ते निष्ठेने पार पाडीत. असे जरी असले तरी धार्मिक कर्मकांड म्हणजे धर्म अशी त्यांची भावना नव्हती. माणसाने माणसाशी मनुष्यत्वाच्या भावनेने, बंधुत्वाच्या भावनेने वर्तन ठेवणे, म्हणजे धर्म अशी त्यांची धारणा होती. १९०२ साली इंग्लंड दौरा केला. धर्माने घातलेली समुद्र बंदी झुगारून दिली.

"शोधक वृत्ती आणि प्रयोगशीलता यांचा संगम"

शाहू महाराजांच्या कारकीर्दीकडे दृष्टीकोन टाकला, तर असे दिसून येते की. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शोधक वृत्ती व प्रयोगशीलता या दोन गुणांचा विलक्षण संगम झाला होता. त्यामुळे त्यांनी मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नवनवीन प्रयोग केले. कला, क्रीडा, उद्योग, कृषी एवढेच नव्हे तर समाजशास्त्रा सारख्या अनेक विषयांत त्यांनी आपल्या प्रयोगशीलतेच दर्शन घडविले.


महाराजांनी ' होमिओपॅथी ' हे शास्त्र काय आहे, याची केवळ माहिती करून घेतली नाही, तर महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक होमिओपॅथिचा दवाखाना कोल्हापूरात स्थापन केला. युरोपच्या दौऱ्यावर असताना रोममधील आखाडे व नाट्यगृह केवळ प्राचीन वास्तू म्हणून पाहिले नव्हते तर तसे आखाडा आणि नाट्यगृह कोल्हापूरात निर्माण केले. युरोपातील धरणे पाहिली आणि आपल्या संस्थानात राधानगरी धरणाची उभारणी केली. त्या काळातील देशातील सर्वात मोठा धरण होता. धरणाची साठवण क्षमता पुर्ण झाली की आपोआपच दरवाजे खुले होऊन जास्तीचे पाणी वाहून जात. या धरणामुळे शेतकरी समृद्ध झाला. उद्योग व्यवसाय भरभराटीला आले. तसेच शाहूपुरी जयसिंगपूर सारखे व्यापारी शहर वसवले. 

संस्थानाच्या जंगलात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हत्तींची पैदास, अभयारण्य निर्माण केले. डोंगर उतारावर चहा कॉफी व रबराची लागवड केली. शेती, उद्योग, क्रीडा सोबत शैक्षणिक क्षेत्रातील कामगीरी उल्लेखनीय आहे. विविध जाती धर्मांचे विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. 

जोगत्या मुरळी प्रतिबंध करण्यासाठी कायदा - 

धर्माच्या नावाखाली देवादिकांना मुले मुली वाहण्याची घृणास्पद पध्दत भारतासह संस्थानात होती. या प्रकारातून अनेक अनैतिक गोष्टी घडत. धर्माससुध्दा हिडीस स्वरूप येई. महाराजांनी जोगत्या मुरळी प्रतिबंध कायदा केला. कायदाच उल्लंघन करणाऱ्यांना जबर शिक्षेची तरतूद केली. 

पुनर्विवाह कायदा -

 हिंदू धर्मशास्त्रात विधवेस विवाह करण्याचा हक्क नव्हता. अगदी लहान न समजणाऱ्या वयातही लग्ने होत. नवरा मेला की, उर्वरित आयुष्य तसेच कंठावे लागे. शाहू महाराजांनी १९१७ साली आपल्या संस्थानात पुनर्विवाह नोंदणी संबंधी कायदा केला आणि त्यामुळे कोल्हापूर संस्थानात पुनर्विवाह करणे कायदेशीर ठरले आणि होणाऱ्या अपत्यास सर्व हक्क प्राप्त झाले. 

_ आरक्षणाचे जनक, वसतिगृह चळवळीचे प्रणेते, अस्पृश्योध्दारक, भटक्या विमुक्त जमातींचे उध्दार कर्ते, मल्ल विद्येचे पुरस्कर्ते, व्यापार  व्यवसाय वृद्धीसाठी शहर वसविणारे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे, अंधश्रद्धेवर प्रहार करून तत्त्वनिष्ठा बाळगणारे, जातीधर्माच्या भिंती झुगारून माणूसकीची भावना रुजविणारे, ब्राम्हणेतर चळवळ वृध्दींगत  करणारा असा लोकराजा होणे नाही.


या लोकराजाचा जन्म दिन सण म्हणून साजरा झाला पाहिजे, असा संदेश महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. त्या लोकराजाच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा... !

- राम गायकवाड,

मराठा सेवा संघ, सोलापूर