Type Here to Get Search Results !

धक्कादायक ... ! महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य; उद्योजक सासऱ्यासह डॉक्टरही पती अटकेत



सोलापूर :  सांगोल्यातील धक्कादायक घटना समोर आलीय. डॉ. पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन महिला डॉ. ऋचा हिनं आत्महत्या केली. याप्रकरणी आता उद्योजक आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आलीय. चार दिवसांपूर्वी डॉ. ऋचा रूपनर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं होतं. आरोपींच्या अटकेसाठी डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. ऋचाचे डॉक्टर पती आणि उद्योजक सासऱ्यास गजाआड केलंय.

डॉ. ऋचा या पती डॉ. सूरज रूपनर याच्या सोबत पंढरपुरात फॅबटेक हॉस्पिटल चालवत होत्या. सांगोल्यातील उद्योजक भाऊसाहेब रूपनर यांच्या स्नुषा असलेल्या डॉ. ऋचा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  ऋचाने कौटुंबिक छळ आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 

एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी पती सूरज रूपनरने ऋचा यांना जमिनीवर कर्ज काढ किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून ऋचा रूपनर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तक्रार दाखल होत नसल्याने सोशल मीडियावर सांगोल्यातील डॉक्टरांनी मोहिम सुरु केली होती. पंढरपुरातील डॉक्टर्सनी एकत्र येत सांगोला पोलीस ठिय्या आंदोलनही केले होते.

ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. डॉ. ऋचा आणि डॉ. सूरज यांचा विवाह ०८ वर्षांपूर्वी झाला होता. उभयतांना एक मुलगा आहे. मात्र डॉ. सूरज हा व्यभिचारी होता. एमआरआय मशिनसाठी त्याने ऋचाच्या मालकीची जमीन गहाण ठेऊन कर्ज काढावे अथवा माहेरुन पैसे आणावेत, असा तगादा लावला होता. त्यामुळे ऋचाने आत्महत्या केली, अशी माहिती ऋषिकेश पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. 

६ जून रोजी डॉ. ऋचाने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानंतर तीन दिवसांनी डॉ. सुरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आधी ऋचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना अटक केली. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून पोलिसांनी सूरज रुपनर यांना अटक केली.

महिला आयोगाने घेतली दखल

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून या प्रकरणात आयोग पाठपुरावा करेल, असे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. 

सोलापूरमध्ये पती डॉ.सूरज रुपनर यांच्याकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला, मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. ऋचा पाटील यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार माध्यमातून समोर आल्यानंतर मी काल पोलीस निरीक्षकांशी फोनवर चर्चा केली होती. फरार आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांच्या शोध पथकांची संख्या वाढवण्याच्या सूचना काल केल्या होत्या.

त्यानुसार कारवाई होत असून बुधवारी सकाळी आरोपी पती आणि सासऱ्यास अटक करण्यात आलीय. आता यापुढील तपास जलदगतीने करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक, सोलापूर यांना देण्यात आलेत. 

शिक्षित कुटुंबातील, रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या आरोपी व्यक्तीचं असं वर्तन अत्यंत निंदनीय आहे. डॉ. ऋचा पाटील पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल," असंही चाकणकर यांनी म्हटलंय.