अक्कलकोट : तालुक्यातील बणजगोळ येथील सेवानिवृत्त केंद्रीय मुख्याध्यापक कल्याणी रेवप्पा होसुरे गुरुजी यांच्या नातीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात साखरपुडा, टॉवेल टोपीचा कार्यक्रम संपल्यावर जेवण करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने होसुरे यांचं जागीच निधन झाले. ते मृत्यूसमयी ८५ वर्षीय होते.
येथील बागेहळ्ळी रोडवरील सुमंगल कार्यालयात रविवारी, ०९ जून रोजी साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेवटच्या जेवणाच्या पंगतीला होसुरे हे देखील जेवण करत होते. यावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने हृदयद्रावक घटना घडलीय.
होसुरे यांच्या दुर्दैवी व आकस्मिक निधनामुळे अक्कलकोट परिसरात व बणजगोळ गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या, सोमवारी सकाळी ११ वाजता बणजगोळ येथील राहत्या घरातून निघणार आहे. ते कोन्हाळी येथील कमलादेवी प्राथमिक आश्रम शाळेतील सहशिक्षक रत्नकांत होसुरे यांचे वडील होत. (शिवभार : मारुती बावडे)