Type Here to Get Search Results !

चित्रांमधून अनुभवला वैभवशाली होळकर राजघराण्याचा इतिहास !


सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रसंग्रहाक रामभाऊ लांडे यांनी संग्रहित केलेल्या २७५ चित्रांमधून वैभवशाली होळकर राजघराण्याचा इतिहास सोलापूरकरांनी अनुभवला. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यासन केंद्राच्यावतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. 


यावेळी चित्र संग्रहाक रामभाऊ लांडे यांच्यासह प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या चित्रप्रदर्शनामध्ये होळकरशाहीमधील दुर्मिळ पत्रे, नाणी, वस्तू तसेच चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ येथील पुतळा व स्मारक, इंदोर येथील स्मारक, अहिल्यादेवी यांच्या कार्यकाळातील न्यायदान पद्धत, विविध मंदिरांचा केलेला जिर्णोद्धार यासोबतच अहिल्यादेवींचा इतिहास सांगणारे विविध चित्रे यात होती. चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापूरकरांनी गर्दी केली होती.

उद्या, गुरुवारी ३० मे रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे ०४ वाजता 'मी अहिल्या बोलतेय' या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण आणि त्यानंतर गजीनृत्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

...फोटो ओळी...

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित चित्र प्रदर्शनात चित्रे पाहताना कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, चित्र संग्रहाक रामभाऊ लांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे आदी.