सोशल मीडियावर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई
सोलापूर : देशातील कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अपमान हा सर्वसमावेशक समाजासाठी अत्यंत घातक आहे. अशा कृत्यांमुळे समाजात तणाव वाढतो, शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. सोशल मीडियावर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन AIMIM शहर व जिल्हाध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यानी बुधवारी दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले.
अशा समाज विघातक प्रवृत्तीच्या मंडळींचे ट्विटर अकाउंट बंद करावेत आणि भारतीय दंड विधान कायद्यांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलीय.
मालेगांवमध्ये MIM पार्टी चे नेते व माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले. मालेगांवचे माजी महापौर अब्दुल मलिक हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार करून फरार झाले.
हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात यावे, त्यासोबतच मालेगांवात गुंडाराज सुरू आहे, अशा अनेक घटना वारंवार मालेगांवमध्ये घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर एमआयएमच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी एमआयएमचे इलियास शेख, नासिर मंगलगिरी, राजा बागवान, युवकअध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर, एजाज बागवान, नदीम डोणगांवकर, सचिन कोलते, वसिम शेख, मच्छीन्द्र लोकेकर, अशफाख बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.