Type Here to Get Search Results !

जिल्ह्याच्या वातावरणास पोषक रेशीम शेती व डाळिंब लागवडीवर द्या भर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

             

सोलापूर :  जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोषक अशा  रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे येथील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी  विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे, आत्मा प्रकल्प  संचालक श्रीमती शितल चव्हाण, विभागीय कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. व्ही. इंडी, कृषि विज्ञान केंद्राचे  शास्त्रज्ञ डॉ.लालासाहेब तांबडे, विभागीय पोस्ट कार्यालयाचे के. नरेंद्र बाबू ,राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. डाळिंब हे पिक कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे आहे. जिल्ह्यात यासाठी पोषक वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन घेत गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच रेशीम शेतीसाठीही पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यशाळेमध्ये  खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयावर प्रमुख तज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच  ऊस पिकांमधील हुमणी किडीचे नियंत्रण, उसाचे पाचट व्यवस्थापन, खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान, सी आर ए पद्धतीने फळबाग लागवड, सुपर केन पद्धतीने ऊस रोपवाटिका स्थापन करणे, बीबीएफ पद्धतीने सोयाबीन लागवड, बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, खरिपातील प्रमुख पिके तूर, उडीद, सोयाबीन यांचे उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकांमधील गोगलगायींचे नियंत्रण, जिल्ह्यामध्ये रेशीम  उत्पादनाची मोहीम इत्यादी विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.