सोलापूर : रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचे उत्पादन घेण्यास पोषक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रेशीम उद्योग आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, आरसिटी चे संचालक दीपक वाडेवाले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे, कॅनरा बँकेचे विजय पाटील यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी महेश होनमाने, कैलास वडते, गणेश मुळे, तुळशीराम विभुते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील रेशीम शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली पाहिजे. जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीबाबत जनजागृती करून रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी रेशीम उद्योग वाढीसाठी आपापल्या विभागाच्या वतीने योगदान देण्यासाठी योग्य नियोजन करावे. सन 2023-24 मध्ये एक हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे. यावर्षी यात अधिक वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन वाढवण्यासाठी तुती लागवड कोश, उत्पादन कोष खरेदी या विषयाची सर्व माहिती जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी विभाग, आत्मा, जिल्हा ग्रामोद्योग आदींनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करावे. यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा, तालुका व गाव पातळीवर आयोजित करावे. रेशीम उत्पादनातील तज्ञ मान्यवर यांच्यासह प्रत्यक्ष रेशीम शेती करून उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शनही कार्यशाळेत द्यावे. रेशीम शेतीचे चांगले उत्पादन घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना रेशीम शेती योजनेअंतर्गत सर्व संबंधित बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात रेशीम शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभवणाऱ्या जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी विभाग, रोजगार हमी विभाग, आत्मा या योजनेसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका, जिल्हा ग्रामोद्योग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ग्रामीण रोजगार व स्वयंरोजगारचे प्रशिक्षण देणारी संस्था तसेच रेशीम उत्पादन घेणाऱ्या काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोलापूर जिल्ह्याला रेशीम उत्पादनात अग्रेसर करण्यासाठी कृती आराखडा करून त्यानुसार पुढील काळात कामकाज करावे असे निर्देशही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा रेशीम विकास अधिकारी पवार यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत रेशीम शेतीची माहिती बैठकीत सादर केली. सन 2019-20 मध्ये 300 एकर रेशीम शेतीचे उद्दिष्ट असताना 507 एकर, सन 2020- 21 मध्ये 300 एकरचे उद्दिष्ट असताना 567, सन 2021-22 मध्ये 530 एकर, सन 2022-23 मध्ये 350 एकर उद्दिष्ट असताना 653 एकर, सन 2023 -24 मध्ये 250 एकरचे उद्दिष्ट असताना 1 हजार 9 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातील उत्तर व दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट व माळशिरस या तालुक्यात तुती लागवडीसाठी अधिक प्राधान्य दिले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी रोजगार हमी योजना, कृषी विभाग व आत्मा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने रेशीम शेती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपायोजनांची माहिती सादर केली.
जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढीसाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांना तसेच रेशीम चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय समितीची स्थापना लवकरच होऊन समितीचे कामकाज सुरू होणार आहे.