Type Here to Get Search Results !

वाळू तस्कर कुमार मेटकरी एम. पी. डी. ए. कायद्यांतर्गत स्थानबध्द


सोलापूर : सोलापूर, सांगली जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळू चोरी करणे, ट्रकमधुन वाळूची वाहतुक-विक्री करणे, दरोडा टाकणे, शासकीय कामामध्ये अडथळा, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे अशा १० गुन्ह्याची नोंद असलेल्या वाळू तस्कर कुमार आनंद मेटकरी (वय-२५ वर्षे) यास एम. पी. डी. ए. कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

सांगोला येथील मिटकरी वस्तीतील रहिवासी कुमार मेटकरी मागील ०८ वर्षांपासून त्याने त्याची दहशत व भिती राहावी, त्यातून त्यास आर्थिक तसेच इतर फायदे मिळावे याकरीता गुन्हेगारी वर्तन करत होता. त्यास यापूर्वी २०२१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, तरी देखील कुमार मेटकरी याने पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.

वाळू तस्कर कुमार मेटकरी याच्या गुन्हेगारी कारवायांवर व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणणारी कृत्ये करण्यास भविष्यातही प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्फतीने जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्व्ये स्थानबध्द करण्यासंबंधी आदेश निर्गमित केल्याने कुमार मेटकरी यास शनिवारी, २५ मे रोजी येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड (मंगळवेढा), पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक बी. एस. खणदाळे, सहा. पो. नि. सचिन जगताप (सांगोला पोलीस ठाणे), बालाजी बनसोडे, ना. तहसिलदार, विलास म्हेत्रे (गृह विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय) स.पो. फौ. निलकंठ जाधवर, स.पो. फौ. कल्याण ढवणे, पो. ना. अनिस शेख, पो.कॉ. पैगंबर मुलाणी यांनी पार पाडली.