सोलापूर : वायफळ खर्चाला फाटा देत डॉल्बीमुक्त जयंती साजरी करून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणे, कौतुकास्पद असून छात्रवीर प्रतिष्ठानने मर्दानी खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण करत छत्रपती शंभुराजे जयंती उत्साहात साजरी करण्याचा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा, असं आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केले.
स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत,ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषमय वातावरणात छत्रपती शंभुराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शंभुराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली.
यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शंभू महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज परिसर दणाणून गेला होता. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, संजय पारवे, नागेश घोरपडे, अजयसिंह सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाल शंभूभक्त समर्थ यादव याने आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली.
सत्कार समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचे विशेष कौतुक करत खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळांनी छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिव विचार घरा-घरापर्यंत पोहोचवत जयंती साजरी करावी, असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, संभाजी भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडळास भेट देऊन स्तुत्य उपक्रमांचं विशेष कौतुक केलं.
याप्रसंगी छात्रवीर प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, वैभव गंगणे, शिवा भोसले, नागेश घोरपडे, अजय मस्के, श्रेयस माने, शितल जगदाळे, करिष्मा लालबेगी, ऋतुजा पवार, सुनीता माने, समृद्धी चव्हाण, यांच्यासह शंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
......... चौकट ........
छत्रपती शंभुराजे जयंतीदिनी
रक्तदान शिबिराचं आयोजन
छत्रपती शंभुराजे यांच्या जयंती निमित्त मंगळवारी, १४ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, आपल्या समाजोपयोगी कार्यास हातभार लावावा, असे आवाहन मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे यांच्यावतीने करण्यात आलंय.