छत्रपती संभाजी महाराज नावाचे जागतिक वादळ भारताच्या इतिहासात सतराव्या शतकात जन्माला आले व शमले. ह्या वादळाने अनेक क्रूर प्रसंग नेहमीसाठी गाडले. सामान्यांना न्याय दिला. शेतकऱ्यांना आधार दिला युवकांना राष्ट्रप्रेम दिलं. लढवय्यांना दिशा दिली. समाजाला भान दिले. रयतेला विश्वास दिला. शत्रूला पराभव दिला. राज्यकर्त्यांना उत्तम संदेश दिला. छत्रपती संभाजी महाराज केवळ शूर , शासक, प्रशासक, महान योध्दा, उत्तम लेखक , कवी, नाटककार, कलाकार, साहित्यिक, भाष्यकार असे बहुभाषी-बहुआयामी व्यक्तीमत्व होते.
त्यामुळेच विविध भाषिक साहित्यिक कलाकार कथाकार कादंबरीकार नाटककार संशोधक वैज्ञानिक राजकारणी समाजसेवक, शेतकरी, युवानेते, योद्धे, अभ्यासक, विद्यार्थी संघटक या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय. भारतीय इतिहासाचे संशोधन व लिखाण दररोज नवनवे सत्य बाहेर आणत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही देशात व देशाबाहेर सतत संशोधन सुरुच आहे. जन्मतःच मातृत्वास मुकलेल्या शंभूराजेंना जिजाऊंनी लहानाचे मोठे केले. त्यांना कळू लागल्यापासून त्यांच्यावर शहाजीराजे आणि शिवरायांच्या पराक्रमाच्या घटना आणि कर्तृत्व कानावर पडत गेले.
राजगडावरील न्यायनिवाड्यात जिजाऊ आणि शिवराय शंभूराजेंना सोबत घेत. सर्वच महाराण्या एक-एक विषय वाटून घेऊन शंभूराजांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण देत गेले. मराठी, हिंदी, इंग्रजी,उर्दू, भोजपुरी, संस्कृत, फारशी, कन्नड, तेलगू, पोर्तुगीज, अरबी, ब्रीज, गुजराती या भाषा अवगत झाल्या. वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा प्रदिर्घ संस्कृत ग्रंथ लिहिले.
याच बरोबर भोजपुरी भाषेत सातसतक, नायिकाभेद, नखशिख या ग्रंथांची निर्मिती केली. स्व: भाषा ज्ञाना सोबतच इंग्रजी , स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हिब्रू, फारशी उर्दू या भाषेवर प्रभुत्व होते. राजनिती, युध्दनिती, राज्यशासन, राज्यप्रशासन, कला, साहित्य, संस्कृती, धर्म, धर्मतत्वे, तत्वज्ञान, इतिहास, भूगोल , परंपरा, समाजव्यवस्था, शेती, नाट्य, संगीत या सह अनेक क्षेत्रात पारंगत केले. तसेच युद्धभूमीवर घोडे-हत्ती-शस्त्रे यांना हाताळण्याची कौशल्य आत्मसात केले.
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी रयतेसाठी शत्रूच्या गोटात ओलिस रहावे लागले होते. आज या वयात घरात सर्व सुखसोयी उपलब्ध असताना एकटं राहण्याची हिम्मत आजच्या मुलांत नाही. यावरुन त्यांच्यामधील धाडस लक्षात येते. वयाच्या नवव्या वर्षी आग्र्याहून सुटून मथूरेस एकटेच राहिले होते.
पुढे जाऊन अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. एकाच वेळी डच, पोर्तुगीज, इंग्रज, मुगल, हबशी, सिद्धी आणि स्वकीयांना तोंड द्यावे लागले. हे करत असताना स्वराज्याचा विस्तार केला. छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र युवकांना धाडस, कल्पकता, शौर्य, विरता, सत्यता, अढळता, अचूकपणा, मनोनिग्रह , कलाप्रेम शिकवतं. आयुष्यात साहित्य, कला, संस्कृती, मानवतावादी, भाषा ज्ञान, विज्ञान, सहृदयता, दातृत्व याचं महात्म्य शिकवतं, शत्रू-मित्र ओळख, हित-अहित फरक समजण्यासाठी शंभूचरित्र उपयुक्त ठरते.
शिवछत्रपतींच्या स्वराज्याच सुराज्यात विस्तार याच शंभूराजेंनी केलं. यदा-कदाचित पुर्ण आयुष्य लाभलं असतं तर स्वराजाचा नकाशा हा कैक पटीने जास्त असता. अल्पकाळात चार ग्रंथ रचणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजचं साहित्य आजही दुर्लक्षितच आहेत. आजच्या युवकांनी जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याची आवश्यकता आहे.
🚩
- राम गायकवाड,
मराठा सेवा संघ, सोलापूर.