सोलापूर : मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथील सौ. अनुराधा भिसे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयातील न्यायालयीन सुनावणीत आरोपीचे वकील अॅड. जयदीप माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मृताचा पती खंडू भिसे, सास-सासरा अशा तिघा आरोपींची न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली.
घर बांधण्यासाठी माहेरकडून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमताने केलेल्या छळास कंटाळून सौ. अनुराधा भिसे हिने १६ ऑगस्ट २०१८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद परशुराम रायबाण (रा. माढा) या भावाने दाखल केली होती. त्यानुसार मृत सौ. अनुराधा हिचा पती खंडू भिसे आणि सासू-सासरे अशा तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी येथील सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीत, पती आणि सासू-सासरे या तिघांच्या जाचहाटाला कंटाळून सौ. अनुराधा भिसे या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनुराधा हिचा मृत्यू अपघाती आहे, स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन ती पेटली, असे तिने दवाखान्यात दिलेल्या मृत्यूपूर्व जबाब स्पष्टपणे सांगितलंय, परंतु संशयावरून तिच्या भावाने आरोपींना या खटल्यात गुंतवलं आहे, फिर्यादी पक्षाच्या विसंगतीपूर्वक जबाबांवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, असं आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव, ॲड. वीरभद्र दासी यांनी तर सरकारतर्फे ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले.