सोलापूर : अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे मेन दरवाजाच्या कडीचे स्क्रू कशाचे तरी सहाय्याने काढून घरामध्ये प्रवेश करून केलेल्या २ घरफोड्यात सुमारे ३२ हजारांची रोकड लंपास केलीय. या घटना रविवारी दुपारी जुळे सोलापुरात घडल्यात. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोणार्क नगरातील पद्मावती रेसिडेन्सीमधील रहिवासी दीपक गजानन मठपती यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील कप्प्यात ठेवलेली १२, ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी दीपक मठपती यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चोरीची दुसरी घटना लोखंडवाला आइसलँड कॉम्प्लेक्स मध्ये आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या घरात रविवारी दुपारी घडली. या घरातून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कोयंडा उचकटून लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्समधील १८, ४०० रुपयांची रोकड चोरून नेलीय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.