Type Here to Get Search Results !

' वेळ आली होती, पण काळ आला नव्हता'; ' युनिटी 'चं सर्वत्र अभिनंदन !


सोलापूर : 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' असं बाका प्रसंगाच्या क्षणी नेहमीच म्हटलं जातं. या म्हणीचा प्रत्यय संभाजीराजे तलावाच्या किनारी थांबलेल्या अनेकांनी अनुभवला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडलीय. एका महिलेनं सुरक्षा तट चढून जवळच्यांना काही वाटायच्या आत तलावात उडी टाकली, ती गटांगळ्या खात असतांना युनिटी बोट क्लबच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडपडीनं तिचं प्राण वाचविण्यात यश आलं. जूबेर, इलियास आणि श्रीनिवास अशी त्यांची नांव असून त्यांच्या धाडसाचं अभिनंदन केलं जातंय.

सोमवारी दुपारची वेळ ... घड्याळाचे काटे दोन ला ओलांडून पुढं निघालेले ... त्याचं वेळी आभाळात ढगांच्या हजेरीनं ऊन-सावलीचा सुरु होता खेळ ... ढगांच्या सरकण्यानं ऊन्हाचा थोडाफार मारा सुरु झालेला ... अशात ०२ वाजून ०४ मिनीटं झाली असतील. एक तरूणी चालत आली ... तलावाला असलेले लोखंडी सुरक्षा तट चढून आसपासच्यांना काही कळायच्या आत तिनं तलावात उडी टाकली. 


आत्महत्या करणं भ्याडपणाचं लक्षण मानलं जातं, पण तिनं धाडस केलं अन् या जगाचा निरोप घेण्याच्या निर्धारानं पुढील पाऊल टाकलं... ती पाण्यात पडल्यावर गटांगळ्या खाऊ लागली, बुडत्याचा पाय नेहमी खोलात असतो, बघ्यांच्या गर्दीतून तिला वाचवण्यासाठी कोणी पाण्यात उडी घेण्याचं धाडस करताना कोणी दिसलं नाही. ती जवळपास दोन मिनिटं पाण्यात वर-खाली होत राहिली. 

या वेळेत युनिटी बोट क्लबचे जीवरक्षक तरुण पुढं आले. त्यांनी सुरक्षा साधनांपैकी हवेने भरलेले ट्युब टाकून पाहिले. बोट थोडीशी पुढं घेऊन तोच प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आलं. त्यांनी तिला बोटीत घेतलं. म्हणतात, 'तिची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता.' 


युनिटी लेक व बोट क्लब तेथे कार्यरत असलेले कर्मचारी जुबेर शेख, इलियास शेख,श्रीनिवास परदेशी यांनी प्रसंगावधान लक्षात घेऊन त्या महिलेला वाचवण्यास तत्परता दाखवली. त्यांच्या तत्परतेने जणू काळाला परतवून लावल्यानं तिचे प्राण वाचले. जुबेर शेख, इलियास शेख आणि श्रीनिवास परदेशी यांनी त्या महिलेला सुखरूपरीत्या बाहेर काढून जणू नवजीवन दिलं. या तिघांचं सर्वत्र कौतुक होत आहे.