सोलापूर : सध्या राज्यात धार्मिकतेच्या विषयावर वातावरण आणि राजकारण ढवळून निघत आहे. राजकीय पटलावर अनेक प्रकारे हिंदू-मुस्लीम वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं सर्वत्र सामाजिक वातावरण दुषित होऊन एकमेकांविषयी कमालीचा द्वेष निर्माण होताना दिसत आहे. अशा वेळी मंद्रूप येथील ख्याडे परिवारानं मुस्लिम बांधवांसाठी इतर पार्टीच्या आयोजन करून सामाजिक सलोखा अन् एकतेचे दर्शन दिलंय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गाव जवळपास महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातील प्रमुख गांव... या गावातील ख्याडे परिवार तसा उद्योग-व्यवसायिक ... उद्योजक चंद्रकांत ख्याडे यांचे बंधू स्व. सुर्यकांत ख्याडे यांनी सरपंच या नात्याने यापूर्वी गांवचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला होता. मुस्लिम बांधवांचा सद्या पवित्र रमजान महिना सुरू आहे,
समाजकारणाला राजकारणाची जोड दिलेल्या ख्याडे परिवारांचं सर्व समाजाशी असलेले स्नेहबंध व सलोख्याचा ताना-बाना कायम ठेवत उद्योजक चंद्रकांत ख्याडे यांनी परिसरातील मुस्लीम बांधवासाठी रोजा इफ्तारी व जेवणाचे आयोजन केले होतं. मंद्रुप येथील जामे मस्जिद येथे हा इफ्तारचा कार्यक्रम पार पडला.
सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी ख्याडे परिवारानं इफ्तार पार्टीचं आयोजन करून माणसातील अंतर कमी करण्याबरोबर मनं जोडण्याचा तसंच हिंदू-मुस्लीम सामाजिक एकतेचा संदेश दिलाय.
यावेळी माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री, उद्योजक प्रदीप ख्याडे, माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला, गुरुलिंग बसवकल्याण, पैलवान मल्लिनाथ मेंडगुदले, मौलाना अन्वर रझा, बाबुलाल निगेबान, नौशाद शेख, जलाल शेख, महिबुब दुमदुमे, इम्रान मुल्ला यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.