पवित्र रमजान महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अल्लाहची रहमत, बरकत, मगफिरत चा हा महिना उद्या पूर्णत्वास जात आहे. गेले महिनाभर जगभरातील मुस्लिम बांधवांनी या महिन्याचे पालन केले. रोजे, नमाज, तरावीह, तिलावत ए कुरआन, जकात, सदकात, खैरात,
अतियात इत्यादी सर्व प्रकारे अल्लाहची प्रार्थना करायचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. अल्लाहताला सर्वांची इबादत कुबूल करो. आमीन. आजारपण, प्रवास किंवा अन्य कारणामुळे जे या महिन्याचे पालन करू शकले नसतील, अल्लाह सर्वांना माफ करो.
या वर्षी देखील महागाई व अन्य समस्यांमुळे अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागले आहे. लोकांचे आर्थिक गणित बदलले, परंतु तरीसुद्धा एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला आहे.
असे म्हणतात कि, अल्लाह भूखा उठाता है, पर भूखा सुलाता नही. दिवसभरामध्ये प्रत्येकाच्या रोजी-रोटीची काही ना काही तजवीज होत असते. आपल्या ध्यानी-मनी नसताना सुद्धा अल्लाहची मदत मिळत असते, याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तीव्र ऊन असून ही सर्वांनी रोजे, नमाज यांचे पालन करीत अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी दररोज सर्वांनी दुआ केली आहे.
कुरआनमध्ये अल्लाहतालाने जग रहाटीचे सर्व नियम नमूद केले आहेत. मात्र माणसाने प्रगतीच्या नावाखाली अधोगतीकडेच वाटचाल केली आहे. विज्ञानाचा वापर मानवाच्या भल्यासाठी करण्याऐवजी विनाशासाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोशल मीडियाचा वापर समाज जागृती ऐवजी अश्लिलता वाढवण्यासाठी करण्यात आला आहे व होत आहे. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या या सर्व देणग्या आपण चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे जगामध्ये सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. यातून सावरण्याची आवश्यकता आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ललल्लाहू अलैही व सल्लम) यांनी दिलेली शिकवण सोडून जर आपण दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला तर आपल्या पदरी निराशाच पडणार आहे. हजरत पैगंबरांनी जीवनासाठी आपल्याला जी नियमावली दाखवून दिली, त्याच पद्धतीने आपण वागले पाहिजे. इतरांचे अनुकरण आपण करता कामा नये. चांगले जरूर घ्यावे, परंतु वाईट वृत्तींचा स्वीकार करू नये. दुर्देवाने आज प्रत्येक जण चांगल्याचे क्षालन आणि वाईटाचं पालन करण्यात मग्न आहे. त्यामुळेच आपण विनाशाकडे जात आहोत. आज निर्माण झालेल्या सर्व समस्या या आपल्या कर्तृत्वाचे फळ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
दैनंदिन जीवनामध्ये आपण जी नीतिमत्ता बाळगली पाहिजे ती पाळली जात नाही. प्रत्येक जण उपदेश करतोय,स्वतःपालन कोणी करायला तयार नाही. त्यामुळेच जगभरात अराजकता माजली आहे. समस्त मानव जात एक आहे, या सूत्राने काम करण्याची गरज असताना आपण त्याला जाती-भेदाच्या भिंती घालून तुकडे पाडायचे काम करीत आहोत. त्यामुळे अपात्र माणसांच्या हाती सूत्रे गेल्याने समस्या वाढत गेल्या आहेत. याचा बोध घेऊन सर्वांनी मानवतेने वागणे आवश्यक आहे. रमजान महिन्याच्या पालनातून याच गोष्टी आपल्या अंगी बाणल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
९२२६४०८०८२