सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२४ मंडळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे, मंडळांनी महावितरणकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव- २०२४ च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी, ०८ एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर.टी.ओ. चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव- २०२४ चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम. राजकुमार होते.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी प्रास्ताविक करुन बैठक आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. १४ ते २१ एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२४ साजरी करण्यात येणार आहे. या जयंती उत्सवाची सांगता रविवारी, २१ एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासून मुर्ती/फोटोस धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी, असंही पोलीस आयुक्तांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडुन तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेऊ नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावी, मंडळाने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांचे मुर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी. सोशल मिडीयावरुन काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, असंही त्यांनी शेवटी सांगितले.
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱहाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती. प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) अशोक तोरडमल, अजय परमार (विभाग-२), सहा. पोलीस आयुक्त (वाहतुक शाखा) यशंवत गवारी, सोलापूर महानगर पालिकेकडील उप-आयुक्त संदिप कारंजे, आर.टी.ओ. संदिप शिंदे, महावितरण अति. कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, इतर प्रशासकीय अधिकारी व तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधु उपस्थित होते.
""""" चौकट """""
डी.जे. विरहित शिवजन्मोत्सव मिरवणूक
०७ मंडळाना पोलीस आयुक्तालयाचं सन्मानचिन्ह
शांतता समितीच्या या बैठकीत सन २०२४ मधील शिवजयंती उत्सव मंडळ यांनी पारंपारिक वाद्यांचा वापर करून डी. जे. विरहित मिरवणूक शांततेत काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
🔸माऊली युवा प्रतिष्ठान, मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर (भजनी मंडळ),
🔹 पत्रा तालीम युवक मंडळ, सोलापूर (लेझीम पथक),
🔸 जय बजरंग तरूण मंडळ, गवळीवस्ती, सोलापूर (लेझीम पथक),
🔹धर्मवीर संभाजी तालीम, जुनी पोलीस लाईन (लेझीम पथक),
🔸 शिवालय बहुउद्देशीय संस्था (लेझीम पथक),
🔹शिव सम्राज्ञी प्रतिष्ठान रेमंड दुकानाजवळ (लेझीम पथक),
🔸 जय महाराष्ट्र तरूण, मंडळ जुनी लक्ष्मी चाळ, सोलापूर (लेझीम पथक) या मंडळांना पोलीस आयुक्तालय यांच्यावतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.