जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासाठी धमकी
सोलापूर : जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी या घटनेसंबंधी व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने राम अशोक जाधव, नागेश प्रकाश इंगळे (N.भाई) यांच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात भा.द.वि.क-३८५,३४ प्रमाणे शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्तर फुट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमिन शेख हे दुकानी असताना छत्रपती शाहु महाराज मागासर्गीय बहुउद्देशिय संस्था हुडको नं-३ कुमठा नाका, सोलापूर चे पदाधिकारी राम जाधव, सोबत इतर दोन लोक हे त्यांचे दुकानी गेले. त्यांनी "मी एन. भाईचे (नागेश प्रकाश इंगळे) वतीने वर्गणीची पावती देण्याकरिता आलो आहे " असे म्हणून २ हजार रुपयांची पावती त्यांचेकडे दिली.
त्यावेळी दुकान मालक यांनी "आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएशनकडे वर्गणी जमा केलेली आहे, तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांचेशी फोनवर बोला" असे म्हटले असता राम जाधव याने "मी कोणाशी फोनवर बोलणार नाही, तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल, तुमच्या अध्यक्षाला एन. भाईकडे पाठवून द्या, ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल" असे म्हणून सदर पावती मालक अमिन शेख यांना देऊन निघून गेला.
नागेश प्रकाश इंगळे उपाख्य N.भाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध यापूर्वी गंभीर स्वरुपाचे ०४ गुन्हे दाखल आहेत. त्यास पोलीस आयुक्त यांनी सन २०१९ साली एक वर्षाकरिता स्थानबध्द केले होते. सन २०२१ साली त्यास एक वर्षाकरिता सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील करण्यात आलं आहे, असे गुंड मंडळात सामिल करून त्यांचे करवी जयंती उत्सव वर्गणी ही जबरदस्तीने खंडणीचे स्वरुपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.
या प्रकारच्या वारंवार होणाऱ्या घटनांवर प्रतिबंध होण्याकामी सर्व मंडळांना जयंती उत्सवाचे किंवा आगामी कोणत्याही उत्सवाचे अनुषंगाने जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसुली न करण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आवाहन केले असून सर्व मंडळाकडे व मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या हालचालीवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहे.
अशा प्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल, तरी जनतेने तातडीने पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.