सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने रविवारी, १४ एप्रिल रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने तसेच ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निर्गमित केले आहेत.
रविवारी, २१ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकीनिमित्त सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने व ताडी दुकाने मद्यविक्रीसाठी बंद राहतील. महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.